महाराष्ट्रातील काँग्रेसचे पदाधिकारी बदला : निरीक्षकांचा अहवाल
मुंबई : खरा पंचनामा
काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते आणि मुंबई अध्यक्ष बदलण्याची गरज आहे. हे फेरबदल करण्याचा निर्णय घ्यायचा असेल तर तातडीने घेण्यात यावा, असा अहवाल पक्ष निरीक्षकांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदावरून भाई जगताप यांना हटविण्याच्या हालचाली सुरू आहेत. वर्षा गायकवाड यांच्याकडे मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते.
काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यातील वाद ताजा आहे. त्याबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी राज्यात रमेश चेनिथल्ला यांना निरीक्षक म्हणून पाठवले होते. त्यांनी राजकीय स्थिती आणि पक्ष संघटनेत फेरबदलाबाबतचा अहवाल काँग्रेस पक्षश्रेष्ठींना दिला आहे. यात प्रदेश काँग्रेसमध्ये नेत्यांमध्ये गटबाजी असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश अध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलण्याची गरज आहे. या पदांवर नव्या नियुक्त्या करायच्या असतील तर त्या लवकरात लवकर कराव्यात, असे या अहवालात म्हटले आहे.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी रमेश चेनिथल्ला यांनी चर्चा केली होती. त्यात या वरिष्ठ नेत्यांशी, फेरबदल केले तर आगामी निवडणुकांमध्ये चांगला निकाल काँग्रेससाठी येईल, असे सागितले होते. कारण पटोले आणि थोरात यांच्या वादात प्रदेश काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये या दोन नेत्यांच्या वादाचा फटका पक्षाला बसू शकतो, असे अहवालात नमूद केले आहे.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांचा प्रभाव नाही. तसेच मुंबईत काँग्रेसची स्थिती दिवसेंदिवस वाईट होत आहे. त्यामुळे जगताप यांना बदला, अशी मागणी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी केली आहे. त्यामुळे या बाबत तातडीने निर्णय होणार आहे. आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांच्या नावावर बहुतांश नेत्यांचे एकमत आहे. विधिमंडळ अधिवेशनानंतर जगताप यांना मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदावरून हटवले जाईल. पटोले यांना हटविले तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाची प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चा आहे. तर विधिमंडळ पक्षनेतेपदावर विदर्भातील नितीन राऊत यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.