हक्कभंग समितीच घटनाबाह्य ठरू शकते : राऊत
मुंबई : खरा पंचनामा
''आम्हाला सगळी पदं माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहेत. त्यांनी शिवसेना निर्माण केली. सध्याचं डुप्लिकेट शिवसेनेचं मंडळ हे विधिमंडळ नसून चोरमंडळ आहे, असं माझं विधान होतं, असं ते म्हणाले. म्हणजे मी विधिमंडळाला चोरमंडळ म्हटलं नसून मी केलेला तो उल्लेख एका फुटीर गटापुरता होता. मात्र, यातीलच काही सदस्यांवर सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. तर त्यातील काही जण हक्कभंग समितीचे सदस्यही आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर हक्कभंग समिती घटनाबाह्य ठरु शकते", असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना विधिमंडळ नव्हे हे चोरमंडळ आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं होतं. या वक्तव्यव्यावरून राऊतांवर जोरदार टीकाही झाली होती.
राऊतांनी केलेल्या वक्तव्यानंतर सरकारकडून हक्कभंग समितीची स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर राऊतांना हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, मध्यंतरी राऊत या नोटीसीबाबत काहीच बोलले नव्हते. पण आज संजय राऊतांनी हक्कभंग नोटीसीला उत्तर दिलं आहे.
त्यांनी विधिमंडळाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी हक्कभंग समितीतील सदस्यांवरच आक्षेप घेतला आहे. तसेच विधिमंडळाची अप्रतिष्ठा होईल, असं वक्तव्य मी केलंच नाही, असंही म्हटलं आहे.
"विधिमंडळाबद्दल मला सदैव आदर आहे. विधिमंडळाची अप्रतिष्ठा होईल, असं कोणतच विधान मी केलं नाही. मात्र, तरी देखील माझ्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करणं हा विरोधकांचा डाव आहे. माझी त्याला काही हरकत नाही. पण माझं विधान काय होतं हे एकदा पहावं", असे प्रतिउत्तर संजय राऊतांनी हक्कभंग समितीला दिले आहे.
दरम्यान, हक्कभंगाच्या नोटीसीला उत्तर देत संजय राऊतांनी आपलं म्हणण मांडलं आहे. आता हक्कभंग समिती यावर काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.