ओडीशातील एकासह मिरजेतील गुरूजी ऊर्फ हुसेन मुल्ला याला अटक
सांगली : खरा पंचनामा
कवठेपिरान (ता. मिरज) येथे १०२ किलो गांजा पकडून चौघांना करण्यात आली होती. एलसीबीने ही कारवाई केली होती. या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी एलसीबीला दिले होते. त्यानुसार पथकाने ओडीशा येथे जाऊन गांजा उत्पादन करणाऱ्या एकास अटक केली. तर त्यांचा मिरजेतील सर्वात मोठा एजंट गुरुजी यालाही अटक करण्यात आली. ओडीशातील आणखी एक गांजा उत्पादक संशयित कुमार प्रभा लिमा ऊर्फ राजू भाई पसार झाला आहे. गांजा उत्पादकांसह त्याच्या एजंटांची पाळेमुळे खणण्यात यश आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
संजीव पत्रिक बेहरा (वय २७, रा. पिंडकी, जि. गजपती, ओडीशा), गुरूजी ऊर्फ हुसेन मैनुद्दीन मुल्ला (वय ४८, रा. दर्गा चौक, मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यापूर्वी या गुन्ह्यात आदिल शहापुरे, सचिन चव्हाण, मयूर कोळी, मतीन पठाण यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त अधीक्षक आंचल दलाल यांनी नशील्या पदार्थांची विक्री, तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांची पाळेमुळे खणण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक शिंदे यांनी एक विशेष पथक तयार केले होते.
कवठेपिरान येथे गांजा पकडल्यानंतर त्यातील संशयितांकडे सखोल चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी हा गांजा ओडीशा येथून आणल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांनी राजू भाई आणि संजीव बेहरा यांच्याकडून त्याची खरेदी केल्याचीही कबुली दिली. त्यानंतर निरीक्षक शिंदे यांनी अधिक तपासासाठी ओडीशा येथे एलसीबीचे एक पथक पाठवले होते.
त्यावेळी तेथे पथकाने माहिती काढल्यानंतर दोघेही संशयित मोहाना तालुक्यातील एका जंगलात लपून बसल्याची माहिती मिळाली. जंगलात जाऊन पथकाने बेहरा याला ताब्यात घेतले. त्यावेळी राजू भाई मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला.
बेहराकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने यापूर्वीही गांजा विक्रीसाठी मिरजेतील गुरूजी ऊर्फ हुसेन मुल्ला याला गांजाची विक्री केल्याचे सांगितले. त्यानंतर पथकाने मुल्ला याला मिरजेतून अटक केली. बेहरा याला शनिवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला पाच दिवसांची तर गुरूजी ऊर्फ हुसेन मुल्ला याला नऊ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान गुरूजी ऊर्फ हुसेन मुल्ला याच्यावर याआधीही गांजा विक्री आणि तस्करीचे गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले.
पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मागर्दशर्नाखाली सहायक निरीक्षक संदीप शिंदे, उपनिरीक्षक विशाल येळेकर, जितेंद्र जाधव, संदीप पाटील, मच्छिंद्र बर्डे, राहुल जाधव, प्रवीण शिंदे, सचिन कनप, आर्यन देशिंगकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.