जतमध्ये नगरसेवकाच्या डोक्यात गोळी, दगड घालून खून : भरदिवसाची घटना
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यातील जत शहरातील नगरसेवकाच्या डोक्यात गोळी घालून नंतर डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून करण्यात आला. शुक्रवारी सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान ही घटना घडली. नगरसेवकाचा भर दिवसा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान अनैतिक संबंध किंवा राजकीय वादातून हा खून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विजय शिवाजीराव ताड (वय 42) असे मृत नगरसेवकाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ताड घराजवळच असलेल्या जत-शेगाव रस्त्यावरील शाळेतून मुलांना आणण्यासाठी कारमधून गेले होते. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ ते पोहोचल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर ते कारमधून उतरून त्यांच्या घराच्या दिशेने धावत सुटले.
ताड धावत असतानाच हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये त्यांच्या डोक्यात गोळी लागल्याचे सांगण्यात आले. हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाहीत तर ताड पळून जाताना खाली पडल्यावर त्यांच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. यामध्ये ताड यांचा जागीच मृत्यू झाला.
नगरसेवकावर गोळीबार तसेच हल्ला झाल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान नगरसेवक ताड यांच्या खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. हा खून अनैतिक संबंध किंवा राजकीय वादातून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.