राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ!
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार आहे. नाशिकच्या मुक्ताईनगर येथील सातोड प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.
या प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांच्या नावाने सातोड शिवारात ३३ हेक्टर ४१ आर जमीनीची खरेदी करण्यात आली. या जमीनीला शालेय कारणासाठी बिनशेती परवाना म्हणजेच एनए प्रदान करताना अनियमितता झाल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात केला होता.
तसेच गौण खनिज प्रकरणात अवैध उत्खनन करत तब्बल ४०० कोटी रुपयांचा महसूल बुडवल्याचा आरोपही करण्यात आला होता. या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची मागणी पाटील यांनी केली होती. त्यानुसार आता नाशिक विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
या प्रकरणात जानेवारी २०१९ मध्ये आधीच एनए झालेल्या शेतीला पुन्हा कृषक करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला. तसेच काही दिवसांमध्येच प्रांताधिकाऱ्यांनी याला तात्काळ शेतीसाठी परवानगी दिल्याचे पाटील यांनी म्हटले होते. यामुळे महसूल खात्याच्या आशीर्वादाने शालेय प्रयोजनासाठी असलेल्या या शेतीला पुन्हा कृषक करण्यात आल्याचा त्यांचा आरोप होता.
यानंतर याच ठिकाणावरून अवैध गौणखनिज उत्खनन करण्यात आले. खरं तर येथे १० हजार ब्रासच्या उत्खननाची परवानगी होती. मात्र येथून लाखो ब्रास मुरूमासह अन्य गौणखनिजाचे उत्खनन करण्यात आल्याचे पाटील यांचे म्हणणे होते. या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली होती.
या मागणीनुसार आता नाशिक विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन केली आहे. विभागीय आयुक्तांना एसआयटीमध्ये निमंत्रित सदस्य म्हणून तज्ज्ञ व्यक्तींना बोलावण्याचे अधिकार असतील.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.