बंद औषध दुकाने फोडणाऱ्या दोघांना अटक : सांगली शहर पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
शहरातील विविध भागातील बंद औषध दुकाने फोडणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीची रोकड आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने दोघांनाही सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती सांगली शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी दिली.
विकाससिंग रूपसिंग टाक (वय 20, रा. कुपवाड), सूरज दगडू केंगार (वय 23, रा. कापसे प्लॉट, कुपवाड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त अधीक्षक आंचल दलाल यांनी चोरीतील गुन्हेगारांना पकडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सांगली शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.
अजित शिंदे यांच्या ज्योतिर्लिंग मेडिकल या दुकानात चोरटे चोरी करत असल्याची माहिती शिंदे यांनी रात्र गस्तीवरील पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्यांच्या दुकानाकडे धाव घेतली. पोलिसांना पाहून चोरट्यांनी त्यांच्याकडील दुचाकी (एमएच 10 डीवाय 4217) तेथेच टाकून पळ काढला. त्या दोघांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी दोन औषध दुकानांत चोरी केल्याची कबुली दिली. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडील चोरीची रोकड, दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अजित टिके, निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक शिंदे, संदीप पाटील, सचिन शिंदे, झाकीर काझी, अभिजित माळकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.