सुनावणीवेळी न्यायाधीशांचे मत म्हणजे निकालाचे संकेत नव्हे : सरन्यायाधीश
मुंबई : खरा पंचनामा
न्यायलयांमध्ये दोन प्रकारचे न्यायाधीश असतात. एक जे विरोधी मत व्यक्त करत वकिलांना प्रोत्साहित करतात तर, दुसरे युक्तिवाद वाढवून तार्किक निष्कर्षापर्यंत नेतील. अशा वेळी न्यायाधीशांद्वारे व्यक्त केले जाणारे मत सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर जाते, तेव्हा न्यायाधीश असा विशिष्ट निर्णय घेतील, असा लोकांना वाटू लागते; जे प्रत्यक्षात वास्तव नसते. शेवटचा युक्तिवाद होत नाही, तोपर्यंत खटल्याचा निर्णय होत नाही, असे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सांगितले.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या चर्चासत्रात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हे मत व्यक्त केले.
ते म्हणाले, आपल्या न्यायालयांमधील बहुतांश युक्तिवाद हे बार आणि खंडपीठ यांच्यातील संवाद असतात. बोलताना एखाद्याला रोखले जाते, विनोद केला जातो, गंभीर वाद घातला जातो वगैरे वगैरे, हा आपल्या संस्कृतीचाच भाग आहे. असे अनेक खटले आहेत, जिथे कदाचित युक्तिवादाच्या शेवटच्या क्षणी मी माझी मते बदलली आहेत. कारण युक्तिवादाच्या शेवटी काहीतरी अतिशय परिणामकारक मुद्दा मांडला गेलेला असतो. खुल्या सुनावणीत असे घडते.
सरन्यायाधीश म्हणाले की, मौन बाळगणाऱ्या न्यायाधीशांची भीती वाटत असल्याचे वकील सांगतात. कारण न्यायाधीश शांत बसलेले असतील आणि त्यांना काय वाटते, हे जर सांगत नसतील तर न्यायाधीशाच्या मनात नेमके कोणते विचार सुरू आहेत, हे समजत नाही. पण सोशल मीडिया कधी कधी हे गृहित धरत नाही किंवा नागरिकांनाही याची कल्पना नसते. मी त्यांना दोष देत नाही. ही प्रणाली जेवढी खुली ठेवाल, तेवढ्या प्रमाणात लोकांना न्यायालयीन प्रक्रियेचे स्वरूप पूर्णपणे समजेल, असे ते म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.