सांगलीत होणार पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा
पुणे : खरा पंचनामा
पुरूषांच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनंतर आता कुस्तीगीर महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे सांगलीत आयोजन करण्यात येणार आहे. आज पुण्यात कुस्तीगीर परिषदेची बैठक झाली. त्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत या स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे.
पुण्यात आज महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची बैठक झाली. त्यानंतर परिषदेचे महासचिव बाळासाहेब लांडगे, कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, काका पवार, पुणे शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष अमोल बराटे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत दि. २३ आणि २४ मार्च रोजी सांगलीत राज्यातील पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत दहा वजनी गटासह खुल्या गटांतील कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. 50, 53, 55, 57, 59, 62, 68, 72 अशा वजनी गटात या स्पर्धा होणार आहेत. महाराष्ट्र केसरी या किताबासाठी 65 वजनी गटावरील मल्ल लढतील. या स्पर्धा मॅटवर घेण्यात येणार असल्याचे नामदेवराव मोहिते यांनी सांगितले.
स्पर्धेतील विजयी मल्लास महिला केसरी किताब आणि चांदीची गदा देऊन गौरवण्यात येणार आहे. महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे यंदाचे पहिले वर्ष असल्याने पहिल्यांदा किताब जिंकणाऱ्या मल्लाची इतिहासात नोंद होणार आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थिती असणार आहे असेही परिषदेतर्फे सांगण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.