विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बदलणार
मुंबई : खरा पंचनामा
विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बदलण्यात येणार आहे. यासाठी विधिमंडळाकडून पुतळा समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची सोमवारी पहिली बैठक आयोजित करण्यात आली आहे. समितीमध्ये विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार रामराजे निंबाळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा समावेश आहे.
सध्या विधानभवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर आरूढ असलेला पुतळा आहे. या पुतळ्याबाबत काही आमदारांनी आक्षेप नोंदवले होते. त्यानंतर पुतळा बदलण्याची मागणी करण्यात येत होती. आता हा पुतळा बदलण्यात येणार आहे.
महाराज बसलेले सिंहासन महाराजांच्या पुतळ्यापेक्षा मोठे आहे. त्याशिवाय, महाराजांच्या पुतळ्यावरचे भाव, तेज कमी दिसत असल्याने प्रभावी वाटत नसल्याचा मुद्दा काही आमदारांनी उपस्थित केला होता. चार-पाच वर्षांपूर्वीदेखील विधानपरिषदेत विधान भवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ असलेला भव्य पुतळा उभारण्याची मागणी करण्यात आली होती. भाजप आमदार निलय नाईक यांनी ही मागणी केली होती. त्यांच्या मागणीला तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीदेखील पाठिंबा दिला होता. त्यानंतर विधानपरिषदेचे तत्कालीन सभापती रामराजे निंबाळकर यांनी दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या संमतीने निर्णय घेण्याची सूचना केली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.