हसन मुश्रीफ यांना ईडीकडून समन्स
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. शनिवारी दिवसभरात मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी तब्बल साडे नऊ तास कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर अवघ्या काही तासांमध्येच ईडीकडून समन्स बजावण्याची कारवाई करण्यात आली आहे.
मुश्रीफ यांना सोमवारी 13 मार्चला ईडी कार्यालयात हजर राहण्याची सूचना समन्सच्या माध्यमातून देण्यात आली आहे. दिवसभरातील कारवाईनंतर हसन मुश्रीफ यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे सोमवारी थेट चौकशीला सामोरे जाणार का? याकडे आता लक्ष लागले आहे. दरम्यान, आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर कागलमध्ये तिसऱ्यांदा छापेमारी केली. त्यामुळे मुश्रीफ अडचणीत आले आहेत का? अशी चर्चा आहे. पहाटे पोहोचलेले इडीचे पथक सायंकाळी 4 वाजून 35 मिनिटांनी मुश्रीफांच्या घरातून बाहेर पडले.
दुसरीकडे, सलग होत असलेल्या चौकशीमुळे मुश्रीफ यांचे कुटुंबीय त्रस्त होऊन गेले आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना कर्ज प्रकरणात ईडीकडून मुश्रीफांच्या कुटुबीयांची चौकशी सुरु आहे. आतापर्यंत मुश्रीफांची थेट चौकशी झालेली नाही. दोनवेळा ते घरी नसतानाच ईडीकडून छापे टाकण्यात आले आहे. आतापर्यंत मुश्रीफांविरोधात ईडीकडून 35 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच मुरगूडमध्ये 40 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात त्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.
न्यायालयाकडून दिलासा मिळाला असतानाच तब्बल साडे नऊ तास ईडीचा फौजफाटा मुश्रीफांच्या घरी तळ ठोकून होता. यावेळी त्यांनी कुटुबीयांचे जबाब नोंदवून घेण्यासाठी प्रिंटर सोबत आणला होता. यावेळी मुश्रीफ यांच्या पत्नी, दोन मुले आणि नातवंडे उपस्थित होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.