गोगावलेंच्या वक्तव्याने बॅकफूटवरील विरोधक आक्रमक!
मुंबई : खरा पंचनामा
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ, असा केला. त्याचे राजकीय वादाचे पडसाद आज विधानसभेत उमटले. अतुल भातखळकर यांच्यासह भाजपच्या आमदारांनी संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्यासाठी सभागृह दणाणून सोडले.
भाजपचे आमदार एकापाठोपाठ संजय राऊत यांनी विधिमंडळाची बदनामी केल्याचं म्हणत आहेत.
मात्र, त्याचवेळी शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार भरत गोगावले यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. यावेळी बोलताना त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी सभागृहात असंसदीय शब्दाचा उल्लेख केला. त्यांनी या शब्दाचा वापर करताच बॅकफूटवर गेलेल्या विरोधी महाविकास आघाडीच्या आमदारांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली.
संजय राऊत यांनी विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही सगळ्यांनी ती क्लीप ऐकली आहे. कोणत्याही गोष्टीला मर्यादा असतात. ती मर्यादा ओलांडल्यानंतर 'अती तेथे माती', हे ठरलेले असते. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाची कारवाई झालीच पाहिजे. संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे भावना प्रचंड भडकत चालल्या आहेत. या माणसाला विधिमंडळाला चोरमंडळ म्हणण्याचा अधिकार कोणी दिला? माणसाने इतकंही ***** नसलं पाहिजे. त्यामूळे संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणा, असं भरत गोगावले यांनी सभागृहात म्हंटलं आहे.
भरत गोगावेल यांची जीभ घसरल्याचे लक्षात येताच सभागृहात राऊत यांच्या वक्तव्यामुळे बचावात्मक पवित्र्यात असणारे महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाल्याचे दिसून आले. बाहेर बोलल्या गेलेल्या गोष्टी सभागृहात तपासल्या जातात. मग इकडे जे आक्षेपार्ह शब्द बोलता, ते देखील मागे घेतले पाहिजेत, असा पवित्रा घेत विरोधकांनी सभागृहाचे कामकाज रोखून धरले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचं वक्तव्य तपासून घेऊ, असं म्हणत कामकाज पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला.
संजय राऊतांच्या विधानावर आक्षेप घेत भाजप आणि शिवसेनेनं त्यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव आणण्याची मागणी केली.
संजय राऊत वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांच्याकडे काहीही राहिलेलं नाही. ते रोज पुस्तकातून नवीन शब्द शोधून काढतात. काहीतरी भडकाऊ बोलल्याशिवाय त्यांच्या बातम्याच होत नाहीत. कारण लोक आता कंटाळले आहेत. त्यामुळे त्यांच्या जीभेला करवंदीचा काटा टोचायला हवा. म्हणजे त्यांच्या जीभेला आवर घातला जाईल. संजय राऊतांवर आम्ही हक्कभंग दाखल करत आहोत. असं शिवसेना (शिंदे गट) प्रतोद भरत गोगावले यांनी सांगितलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.