मनपा, नगरपालिका निवडणूक सुनावणीसाठी 'तारीख पे तारीख'
नवी दिल्ली : खरा पंचनामा
महाराष्ट्रातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा यांच्या निवडणुकीबाबत सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा एकदा नवी तारीख देण्यात आली आहे. निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात गेली आठ महिने 'तारीख पे तारीख' सुरु आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या प्रकरणाच्या सुनावणीसाठी नव्यानं तारखा दिल्या जात आहेत. काल याबाबत सुनावणीची तारीख होती, पण घटनापिठाच्या कामकाजामुळे सुनावणी होऊ शकली नाही. आज सकाळी याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी साडेदहा वाजता मेन्शनिंग करत त्यानंतर एका नव्या तारखेची मागणी करण्यात आली. त्यावेळी 10 एप्रिल ही पुढील सुनावणीची तारीख देण्यात आली.
आज सर्वोच्च न्यायालयात संपूर्ण प्रकरण मेन्शन करण्यात आलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून कोणताही ठोस निर्णय न्यायालयात होऊ शकलेला नाही. अशातच आणखी एक नवी तारीख न्यायालयाकडून देण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 92 नगरपरिषदांमध्येही ओबीसी आरक्षण लागू व्हावं, बदललेल्या वॉर्ड रचनेला दिलेलं आव्हान या गोष्टी कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या असल्यानं निवडणुका खोळंबल्या आहेत. ओबीसी राजकीय आरक्षणाला मंजुरी दिलेली आहे, 92 नगरपरिषदांसाठी केवळ निवडणूक आयोगाला आदेश द्यायचं काम बाकी आहे, असं गेल्या वेळी वकीलांनी कोर्टात सांगितलं होतं.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकित ओबीसी आरक्षणाला ग्रीन सिग्नल मिळाला. पण आधी जाहीर झालेल्या 92 नगरपरिषदांमध्येही हे आरक्षण मिळावं यासाठी शिंदे सरकारने न्यायालयात धाव घेतली. सोबतच मविआच्या काळातली वॉर्डरचना 4 ऑगस्ट रोजी एका अध्यादेशानं या सरकारनं बदलली. 22 ऑगस्टला सुप्रीम कोर्टानं जैसे थे आदेश दिला, त्यानंतर आत्तापर्यंत या प्रकरणाची सुनावणीच होऊ शकलेली नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.