सांगलीत अट्टल चोरट्यास अटक, सव्वादोन लाखांचे दागिने, रोकड जप्त
सांगली : खरा पंचनामा
सांगली शहर परिसरात घरफोडी, चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून सोन्या, चांदीचे दागिने, रोकड असा सव्वादोन लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सांगली शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी दिली.
जावेद रफीक जानकर (वय २५, रा. शंभर फुटी रस्ता, पोळ मळा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त अधीक्षक आंचल दलाल यांनी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक देशमुख यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.
सांगलीतील शामरावनगर येथे एक व्यक्ती चोरीच्या उद्देशाने संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती निरीक्षक देशमुख यांना मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने शामरावनगर परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर तीन ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने, रोकड असा सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शहरचे पोलिस उपअधीक्षक अजित टिके, निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, विनायक शिंदे, सचिन शिंदे, झाकीर काझी, संदीप पाटील, अभिजित माळकर, राजेश पाटील, अमोल कदम आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.