सांगलीत बार चालकाकडून पन्नास हजारांची खंडणीची मागणी, दोघांना अटक
सांगली : खरा पंचनामा
शहरातील विश्रामबाग येथील हॉटेल साई प्रार्थनाच्या चालकाला धारदार कुकरीचा धाक दाखवत त्याच्याकडे दर महिन्याला पन्नास हजारांची खंडणीची मागणी करण्यात आली. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोघांना अटक करण्यात आली आहे.
अनिरूद्ध संजय माने (वय २२, रा. सिद्धाथर्नगर, कुपवाड), अर्जुन चंद्रकांत म्हारगुडे (वय २४, रा. रविवार पेठ, माधवनगर) आणि अनोळखी दोघे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी हॉटेल चालक देवीप्रसाद शेट्टी यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास चारही संशयित हॉटेल साई प्रार्थना येथे दारू पिण्यासाठी आले होते. दारू पिऊन झाल्यानंतर चौघेही कॅश काऊंटरवर आले. तेथे त्यांनी आम्ही पैसे देणार नाही. तुमची सेवा खराब आहे. आम्ही कोण आहे तुम्हाला माहित नाही. मी कुपवाडचा दादा आहे. तुम्हाला मस्ती आली आहे का. दर महिन्याला पन्नास हजारांची खंडणी द्या तसेच दारू, जेवण फुकट द्या नाहीतर तुम्हाला धंदा करून देणार नाही. तुम्ही कसे जिवंत राहता तेच बघतो असे म्हणून एकाने त्याच्याजवळील कुकरी काढून हॉटेलचा व्यवस्थापक सागर कोरे याला धमकावले.
याची माहिती मिळाल्यानंतर शेट्टी हॉटेलमध्ये गेले. त्यावेळी एकजण हातात कुकरी घेऊन हॉटेलमधील सर्वानाच धमकावत होता. नंतर त्याला पकडून त्याच्याकडील कुकरी काढून घेतली. त्यावेळी त्यांचे दोन साथीदार पळून गेले. त्यानंतर माने आणि म्हारगुडे यांना पकडून ठेवले.
त्यानंतर शेट्टी यांनी याची माहिती विश्रामबागचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांना दिली. त्यांच्या सूचनेनुसार सहाय्यक निरीक्षक अमितकुमार पाटील यांनी घटनास्थळी सहकाऱ्यांसह धाव घेतली. दोघांनाही ताब्यात घेतले. त्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.