उदयनराजे यांच्या पेंटिंगवरून साताऱ्यात तणाव!
सातारा : खरा पंचनामा
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराजवळ असणाऱ्या इमारतीच्या भिंतीवर खासदार उदयनराजे भोसले यांचे पेंटिंग काढण्याच्या कारणावरुन गेल्या चार दिवसांपासून तणाव निर्माण झाला आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे. मंगळवारी सकाळी पुन्हा हे चित्र काढण्याचे काम सुरु करण्यात आले. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत काम थांबवले, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
साताऱ्यातील राहुल पाटोळे हे खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक असून त्यांनी उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त तालीम संघाजवळील एका इमारतीच्या भिंतीवर त्यांचे मोठे छायाचित्र रेखाटले आहे. त्याच धर्तीवर त्यांनी पोवई नाका येथे असणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांच्या मालकीच्या इमारतीच्या भिंतीवर छायाचित्र काढण्यासाठीची तयारी सुरु केली होती.
क्रेनच्या माध्यमातून भिंत रंगविल्यानंतर शनिवारी त्याठिकाणी छायाचित्र काढण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली. यासाठी आणलेली क्रेन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाच्या प्रवेशव्दारावर उभी करण्यात येत होती. यास पालकमंत्र्यांचे पुत्र यशराज देसाई यांनी हरकत घेत देसाईसाहेब आल्यानंतर चर्चा करुन पुढील कारवाई करा, असे संबंधितांना सांगितले.
त्यानंतर बंदोबस्तावरील पोलिसांनी त्याठिकाणी आलेल्यांना हटकले. याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी रात्री त्याठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. दरम्यान या प्रकाराची माहिती काहीजणांनी खासदार उदयनराजे भोसले यांना दिल्याची चर्चा सुरु झाली.
उदयनराजे त्याठिकाणी येतील, या शक्यतेवर शंभूराज देसाई यांच्या घराजवळ जास्तीचा पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला होता. यानंतर पडद्याआड काही घडामोडी घडल्या आणि छायाचित्र रेखाटण्याचे काम थंडावले. हे काम थंडावले असले तरी त्याठिकाणचा पोलिस बंदोबस्त कायम होता. आज सकाळी ते काम पुन्हा सुरु झाले. छायाचित्राच्या मार्किंगचे थोडे काम झाल्यानंतर हे काम पुन्हा एकदा बंद करण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.