गाडी घासल्याच्या कारणावरून बोरगावात एकाचा खून, तिघे संशयित ताब्यात : कवठेमहांकाळ पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे महिंद्रा कार रिक्षाला घासल्याच्या कारणावरून एकाचा चाकूने वार करून निर्घृण खून करण्यात आला. शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. याची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिसांनी तातडीने हालचाली करत ढालेवाडी येथून तीन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती कवठेमहांकाळचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी दिली.
बाळासाहेब शिंदे (वय ६५, रा. वाघोली) असे यातील मृताचे नाव आहे. याप्रकरणी सांगलीतील संजयनगर येथील मद्यधुंद असलेल्या तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी बाळासाहेब शिंदे त्यांची महिंद्रा कार घेऊन बोरगाव येथून निघाले होते. त्यावेळी एका रिक्षाला (एमएच 10 सीक्यू 1254) त्यांची कार घासली. त्यानंतर रिक्षातील तिघांनी त्यांची गाडी थांबवून त्याबाबत जाब विचारला.
त्यांच्यातील वाद वाढत गेला. त्यानंतर रिक्षातील तिघांनी त्यांना ढकलून देत मारहाण केली. नंतर त्यांच्या पोटात चाकूने सपासप वार करून त्यांना रस्त्याकडेला ढकलून देऊन तिघेजण तेथून निघून गेले. खुनाच्या घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने हालचाली करत रिक्षाच्या क्रमांकावरून मालकाच्या मोबाईल क्रमांकाचा शोध घेतला. त्यानंतर त्यांचे लोकेशन काढून ढालेवाडी येथून तिघांना ताब्यात घेतले.
किरकोळ कारणावरून शिंदे यांचा खून झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान कवठेमहांकाळ पोलिसांनी खुनाच्या घटनेनंतर काही तासातच सांगलीतील संजयनगर येथील तीन संशयितांना ताब्यात घेण्यात यश मिळवले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.