10 हजारांची लाच घेताना कुपवाडचा तलाठी जाळ्यात
पूर्वाश्रमीच्या उपनिरीक्षकाचे पुन्हा पोलिस दलात परतण्याचे स्वप्न भंगले
सांगली : खरा पंचनामा
मिरज तालुक्यातील कुपवाड येथील तलाठ्याला दहा हजारांची लाच घेताना शुक्रवारी दुपारी रंगेहात पकडण्यात आले. दरम्यान हा तलाठी पूर्वाश्रमीचा पोलिस उपनिरीक्षक होता. या कारवाईमुळे पुन्हा पोलीस दलात परतण्याचे त्याचे स्वप्न भंगले. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
सचिन प्रल्हाद इंगोले (वय 38, रा. विजयनगर, कुपवाड रोड, सांगली) असे लाच घेणाऱ्या तलाठ्याचे नाव आहे. तक्रारदाराने त्याच्या मित्राच्या आजोबांचे नाव सातबारा उताऱ्यावर लावण्यासाठी इंगोले याने त्याच्याकडे 10 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने याबाबत सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. विभागाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर इंगोले याने लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी त्याला पकडण्यासाठी सापळा लावला होता. त्यावेळी इंगोले याला दहा हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सांगलीचे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, पोलीस अंमलदार ऋषिकेश बडणीकर, अजित पाटील, सलीम मकानदार, रविंद्र धुमाळ, चंद्रकांत जाधव राधिका माने, चालक अनिस वंटमुरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
पुन्हा पोलिस दलात जाण्याचे स्वप्न अधुरेच
सचिन इंगोले हा पूर्वी पोलिस दलात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होता. ती नोकरी सोडून तो तलाठी बनला होता. त्यानंतर तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. पण त्यात यश येत नसल्याने तो पुन्हा पोलिस दलात जाण्यासाठी प्रयत्नशील होता. तो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्याने पुन्हा पोलिस दलात जाण्याचे त्याचे स्वप्न अपूर्णच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.