कर्नाटकात नेत्यांची हेलिकॉप्टर, गाड्यांची तपासणी : 253 कोटी जप्त
बंगळुरू : खरा पंचनामा
कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यावेळी निवडणूक आयोगाने कर्नाटकातील विविध पक्षाच्या नेत्यांची हेलिकॉप्टर, गाड्यांची तपासणी सुरू केली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून सुमारे 253 कोटींची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने शनिवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि त्यांचे कुटुंबीय प्रवास करत असलेल्या खासगी हेलिकॉप्टरची तपासणी केली. शिवकुमार यांचे कुटुंबीय बंगळुरूहून दक्षिण कन्नड जिल्ह्यात असलेल्या धर्मस्थला येथे चालले होते.
धर्मस्थला मंजुनाथ स्वामी मंदिरात तीर्थयात्री म्हणून शिवकुमार यांचे कुटुंबीय आले होते. धर्मस्थला येथे हेलिकॉप्टर उतरताच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरची तपासणी करायची असल्याचे सांगितले. या वेळी हेलिकॉप्टरच्या पायलटने याला विरोध केला. सदर हेलिकॉप्टर निवडणुकीच्या कामासाठी नसून खासगी दौऱ्यावर आहे. याची कल्पना आयोगालासुद्धा दिलेली असल्याचे पायलटने सांगितले. मात्र तरीही आयोगाचे अधिकारी तपासणी करण्यावर ठाम राहिले. सदर तपासणीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कर्नाटकमध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर २९ मार्च रोजी आदर्श आचारसंहिता घोषित करण्यात आली. विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान चुकीच्या प्रथांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी डोळ्यात तेल घालून ठिकठिकाणी तपास आणि धडक कारवाई करत आहेत. हे करत असताना त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या गाडीचीही तपासणी केली. ३१ मार्च रोजी बोम्मई चिक्कबल्लापुर जिल्ह्यातील मंदिरात दर्शन घेण्यासाठी जात असताना त्यांची गाडी रोखून झडती घेण्यात आली.
२९ मार्चपासून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी २५३ कोटींची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे. सोने, भेटवस्तू, मद्य आणि अमली पदार्थांचा साठाही या काळात जप्त करण्यात आला आहे.
१७ एप्रिल रोजी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी भाजपाचे नेते आणि कर्नाटक निवडणूक प्रभारी के. अन्नामलाई यांच्याही हेलिकॉप्टरची तपासणी केली. ते उडपी येथून दक्षिण कन्नड जिल्ह्यात प्रवास करत होते. कापू विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विनय कुमार सोरके यांनी अन्नामलाई यांच्यावर रोख रक्कम हेलिकॉप्टरमधून नेल्याचा आरोप केला होता. अन्नामलाई यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केल्यानंतर निवडणूक आयोगाने निवेदन काढून सांगितले की, आम्ही उडपी आणि कापू येथे त्यांच्या हेलिकॉप्टर आणि गाड्यांची सहा वेळा तपासणी केली. मात्र त्यांनी नियमांचा भंग केल्याचे आढळून आले नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.