राष्ट्रवादी भाकरी फिरवणार? प्रदेशाध्यक्ष पदासाठी 3 नावे चर्चेत!
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी मुंबईत भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे असे वक्तव्य केले आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काळात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे तब्बल पाच वर्षे प्रदेशाध्यक्ष आहेत. पक्षाच्या इतर सेलचे अध्यक्षसुद्धा अनेक वर्षापासून त्या-त्या पदावर काम करीत आहेत. जयंत पाटील यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष नेमायचा झाला तर राष्ट्रवादीत अनेक इच्छुक आहेत.
आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री राजेश टोपे आणि धनंजय मुंडे ही तीन प्रमुख नावे सध्या चर्चेत आहेत. शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा पाच वर्षांपूर्वी जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष झाले त्यावेळीसुद्धा होती. मात्र, काही कारणाने त्यावेळी हे नाव मागे पडले. यावेळी पुन्हा शशिकांत शिंदे यांच्या नावाचा विचार होणार की धनंजय मुंडे आणि राजेश टोपे यांच्या नावावर विचार होणार यावर मतमतांतरे आहेत.
पक्षाचे अध्यक्ष पवार यांनी बुधवारी मुंबईत केलेल्या वक्तव्याचा विचार केला तर केवळ पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद नव्हे तर युवक, युवती, विद्यार्थी आणि ओबीसी या प्रमुख प्रमुख सेलच्या अध्यक्षपदांबाबत देखील भाकरी फिरवली जाण्याची शक्यता आहे. या प्रत्येक सेलवर काम करणारे अध्यक्ष हे गेल्या अनेक वर्षापासून त्या पदावर काम करीत आहेत. त्यामुळे आता पक्षातील अनेक नव्यांना संधी मिळेल अशी आशा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
येत्या काळात राज्यात महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत. येत्या वर्षभरात या निवडणुका निश्चितपणे होतील. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याचे केलेले वक्तव्य नेमकं टायमिंग साधणारे आहे. पवार यांनी सुचित केल्याप्रमाणे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेत खालपासून वरपर्यंत प्रचंड बदल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.