सातारा पोलिसांचे बनावट ओळखपत्र घेऊन फिरणाऱ्या तोतयासअटक
पुणे : खरा पंचनामा
गाडीला काळ्या काचा लावून बिनधास्त फिरणारा व चौकशी करणाऱ्या पोलिसांवर रुबाब करणाऱ्याला अटक करण्यात आली. पेहराव, वाढलेले केस, दाढी पाहून त्याची तोतयागिरी उघड झाली. शिवाय सातारा पोलिसांचे बनावट ओळखपत्र त्याच्याकडे सापडले. सातारा येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांबाबत त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी त्याला अटक केली.
ओमकार धर्माधिकारी (वय ३२, रा. मु पो. अनपटवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे अटक केलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी सागर पाडळे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना अलका टॉकिजजवळील टिळक चौकात मंगळवारी रात्री साडेआठ वाजता घडली.
सागर पाडळे व त्यांचे सहकारी टिळक चौकात वाहतूक नियमन करत होते. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एक कार टिळक चौकातून केळकर रोडला जात होती. या गाडीला काळ्या काचा लावल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी गाडी बाजूला घेण्यास सांगितले.
त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने आपण पोलीस असल्याचे सांगितले.
तसेच माझ्यावर कारवाई करु नका, नाही तर तुम्हाला महाग जाईल, अशी धमकी दिली.
त्याच्या बोलण्या -वागण्यावरुन व त्याचा पेहराव त्याचे वाढलेले केस व दाढी यामुळे पोलिसांना तो पोलीस नसल्याचा संशय आला. त्याच्याकडे ओळखपत्र मागितल्यावर त्याने सातारा पोलिसाचे ओळखपत्र दाखविले. त्याच्याकडे पदाबाबत तसेच त्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबाबत चौकशी केल्यावर तो गोंधळला.
अधिक चौकशी केल्यावर त्याने मित्राचे पोलिस ओळखपत्र बघुन त्याप्रकारचे डुप्लीकेट ओळखपत्र बनविल्याचे सांगितले.
वाहतूक पोलिसांनी त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.