काँग्रेस आणि ठाकरे गटातील मतभेद संपुष्टात!
मुंबई : खरा पंचनामा
सावरकरांच्या मुद्दय़ावरून काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यात ताणलेले संबंध काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल व शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील भेटीमुळे संपुष्टात आले. दोन्ही पक्षातील गैरसमज दूर झाले असून, लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांच्याबरोबर शिवसेनाही मैदानात उतरली आहे, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
काँग्रेस शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे, तसेच शिवसेनाही दोस्ती म्हणजे एक नाते निभावते अशा शब्दात वेणुगोपाल व ठाकरे यांनी यापुढे एकजुटीने राहण्याची ग्वाही दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधाने केल्यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले होते. सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिल्यामुळे काँग्रेसमध्येही अस्वस्थता पसरली होती. या मुद्दय़ावरून राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व शिवसेनेतील संबंध ताणले गेले होते. परंतु सध्याची परिस्थिती पाहता, भाजपच्या विरोधात ठामपणे उभ्या राहिलेल्या पक्षांमध्ये एकजूट ठेवण्यासाठी दोन पावले माघार घेण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.
त्यादृष्टीने राष्ट्रीय स्तरावर राहुल गांधी यांचे प्रयत्न सुरू आहेत. मतभेद दूर करण्यासाठी काँग्रेस सरचिटणीस वेणुगापोल यांनी सोमवारी मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. या वेळी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा, तसेच शिवसेना नेते खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे आदी नेते उपस्थित होते. सुमारे तासभर या नेत्यांमध्ये चर्चा झाली.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना वेणुगोपाल व उद्धव ठाकरे यांनी देशात कधी नव्हे इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, मोदी सरकारच्या विरोधात लढण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची एकजूट आवश्यक आहे, त्यादृष्टीने बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.