मिरजेतील परिस्थिती नियंत्रणात : अफवा पसरवणाऱ्यांची गय नाही
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा इशारा
मिरज : खरा पंचनामा
मिरजेत मूर्तीची विटंबना करणाऱ्या संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या घटनेला कोणीही, कोणतेही अन्य वळण देऊ नये. मिरजेतील सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. या घटनेबाबत कोणीही, कोणतीही अफवा पसरवू नये अन्यथा त्याची गय न करता त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करू, असा इशारा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी खरा पंचनामाशी बोलताना दिला आहे.
मिरजेत एका मूर्तीची विटंबना करण्यात आली होती. याची माहिती मिळताच अनेक धार्मिक, राजकीय संघटना आक्रमक झाल्या होत्या. या घटनेनंतर मिरज शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर सांगलीचे पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी फॉजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. याची माहिती मिळताच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी मिरजेत दाखल झाले.
श्री. फुलारी यांनी मिरजेत येताच आक्रमक जमावाशी संवाद साधला. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन तेथील महिला, नागरिक यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी विविध धार्मिक, राजकीय संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून शांततेचे आवाहन केले. शिवाय यातील संशयितांना ताब्यात घेतल्याचेही त्यांनी सर्वांना सांगितले. त्यानंतर तणाव निवळला.
याबाबत बोलताना श्री. फुलारी म्हणाले, मिरजेतील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. विविध संघटनांनी घोषित केलेले आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मिरजेसह सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर येथील कोणीही मिरजेतील घटनेबाबत अफवा पसरवू नये. अफवा पसरवून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांची गय न करता त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
या घटनेतील संशयितांकडे कसून चौकशी सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मिरजेत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणात सांगली पोलिसांनी चांगली भूमिका बजावली आहे असे म्हणत त्यांनी सांगली पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.