सर्वच शासकीय विभागातील बदल्या ऑनलाईन करा!
कोल्हापूर : खरा पंचनामा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केल्यानंतर आता सर्व बदल्या ऑनलाईन करण्याची मागणी एका ट्विटद्वारे केली आहे. ऑनलाईन बदल्या करून बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्याची मागणी शेट्टी यांनी केली आहे.
राजू शेट्टी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सहा दिवसांपूर्वी मी राज्यातील तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार, कलेक्टर, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, पोलीस, आयुक्त सचिव यांच्यासह सर्वच विभागामध्ये होणाऱ्या या भ्रष्ट कारभाराचा पाढाच वाचवून दाखवला. यानंतर राज्यातील शेकडो अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मला फोनवर व प्रत्यक्ष भेटून आवाज उठवण्याची विनंती केली. राज्यातील आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मिशीला खरकटे लागले असल्याने सरकारने विधी व न्याय विभागाच्या धर्तीवर सर्व विभागाच्या बदल्या ऑनलाईन कराव्यात.
दरम्यान, यापूर्वी राजू शेट्टी यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला होता. बदल्यांचा हंगाम सुरु असल्याने या बदल्यांसाठी लाखोंच्या घरात दर निघाल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे रेटकार्डच जाहीर केलं होते. तलाठ्यासाठी पाच लाख, तहसीलदारसाठी 25 लाख तर जिल्हाधिकारी यांच्या बदलीसाठी 5 कोटींचे दर ठरले असल्याचा दावा राजू शेट्टी यांनी केल्यानंतर खळबळ उडाली होती.
प्रत्येक खात्यात भ्रष्टाचार सुरु असून याचा त्रास सर्वसामानांना होत आहे. बदल्यांच्या अक्षरश: बाजार मांडला जात असल्याने अशा भ्रष्ट व्यवस्थेविरोधात माझ्यासारख्याने का आवाज उठवू नये? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.