Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरज अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण : सिव्हिलमधून पालकांना हाकलले, पोलिसांनीही घेतली नाही दखल

मिरज अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण : सिव्हिलमधून पालकांना हाकलले, पोलिसांनीही घेतली नाही दखल



मिरज : खरा पंचनामा

मिरजेतील रेल्वे स्थानक परिसरात झोपलेली अल्पवयीन मुलगी कोल्हापूर रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाखाली सापडली. तिच्यावर अज्ञातांनी रात्रभर अत्याचार केला. रविवारी रात्री आठ ते सोमवारी पहाटे साडेपाचच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी तब्बल चार दिवसांनी मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना घडल्यानंतर पीडित मुलीच्या पोटात दुखत असल्याने पालकांनी तिला मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तसेच सिव्हिलमध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी दखल घेतली नाही. त्यामुळे या प्रकरणात नेमकी  चूक कोणाची असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

या घटनेमुळे मिरजेतील अवैध व्यवसाय आणि गर्दुल्ले यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी मिरज रेल्वे स्थानक परिसरातील गदुर्ल्यांवर अंकुश नसल्याने अशा घटना घडत असल्याचे बोलले जात आहे. 

पीडित मुलगी रविवारी रात्री रेल्वे स्थानक परिसरात आई-वडिलांसोबत झोपली होती. सोमवारी पहाटे मिरज-कोल्हापूर रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाखाली ती सापडली. त्यावेळी अज्ञातांनी त्या मुलीचे अपहरण केले. तिच्यावर क्रुरपणे अत्याचार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. ही घटना घडल्यानंतर पीडित मुलीचे पालक तिला घेऊन मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे त्यांची दखल घेतली नाही. नंतर ते पालक सिव्हीलमधील पोलिसांकडे गेले. तिथेही दखल घेतली नाही असे पालकांनी सांगितले.

त्यानंतर पालक तिला घेऊन तिच्या मूळ गावी गेली. तेथे तिला त्रास होत असल्याने मुलीला तेथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तेथील स्थानिक पोलिसांनी याची नोंद घेतली. त्यानंतर त्याबाबत मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला. त्यानुसार घटना घडल्यानंतर तब्बल चार दिवसांनी याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

संशयित अजूनही मोकाटच
गेल्या काही महिन्यांपासून मिरजेतील पोलिसांचा या भागात वचकच राहिला नसल्याचे दिसून येते. गर्दुल्ले आणि नशेखोर लोकांनी मिरज रेल्वे स्थानकाला अड्डा बनवले आहे. या परिसरात अजूनही अनेक अवैध व्यवसाय चालतात. यापूर्वी गर्दुल्यांसह अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. अलिकडील काळात अशी कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातच अशी घटना घडल्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणातील संशयितांना लवकरच अटक करू असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र या गुन्ह्यातील आरोपी अजूनही मोकाटच आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.