शामरावनगरमधील मूलभूत सुविधांबाबत रिट याचिका दाखल करणार!
आण्णा लोकसेवा फौंडेशनचे अध्यक्ष अशोक मासाळे यांचा इशारा
सांगली : खरा पंचनामा
सांगली शहरातील शामरावनगर येथे महापालिकेने गेली कित्येक वर्षे मूलभूत सुविधा पुरवलेल्या नाहीत. याबाबत तत्कालीन महापालिका आयुक्तांना दि. ८ जानेवारी २०२१ रोजी वकिलामार्फत नोटीसही पाठवली होती. मात्र अद्यापही शामरावनगर येथे मूलभूत नागरी सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत. त्यामुळे याबाबत दाद मागण्यासाठी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करणार असल्याचा इशारा आण्णा लोकसेवा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक मासाळे यांनी दिला आहे.
श्री. मासाळे यांनी वकिलामार्फत दिलेल्या नोटीशीत म्हटले आहे की, वारंवार मागणी करूनही शामरावनगर येथे ड्रेनेजचे काम झालेले नाही. त्यामुळे सांडपाणी रिकाम्या जागी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे साथीचे रोग वाढत आहेत. या परिसरात तक्षिला इंग्लीश स्कूल, उर्दू हायस्कूल, मस्जिद असून तेथे सांडपाण्याचा निचरा होण्याची कोणतीही सोय नाही. त्यामुळे विद्याथ्यार्च्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. संपूर्ण शामरावनगर परिसरात बंदिस्त गटारीचे कामही पूणर् झालेले नाही.
ड्रेनेजसाठी ठिकठिकाणी रस्ता खोदण्यात आला असून काम पूर्ण न झाल्याने शामरावनगर परिसरातील नागरिकांना ये-जा करताना त्रास होत आहे. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावरच पाणी साचत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील होत आहे. शामरावनगर ते धामणी रस्त्याचे कामही अर्धवट आहे. या परिसरात महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. या परिसरातील स्ट्रीट लाईटचे काम झालेले नाही. रात्री रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य असल्याने महिलांना घराबाहेर पडताना अडचणी निर्माण होत आहेत, असेही मासाळे यांनी दिलेल्या नोटीसीत म्हटले आहे.
या नोटीसीची दखल घेऊन शामरावनगर परिसरात नियमित साफ-सफाई, रस्ते दुरूस्ती, औषध फवारणी, ड्रेनेजचे काम पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. या मागण्यांची त्वरीत दखल न घेतल्यास योग्य न्यायालयात दाद मागण्यात येईल. त्याचा सर्व खर्च, परिणामांची जबाबदारी आयुक्तांवर राहील असेही नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.