कवठेमहांकाळमध्ये सुगंधी तंबाखू, गुटखा जप्त, सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त
कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली एलसीबीची मोठी कारवाई
सांगली : खरा पंचनामा
कवठेमहांकाळ येथे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू आणि गुटखा तसेच त्याची वाहतूक करणारे दोन ट्रक असा सुमारे सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. सांगली एलसीबीने ही कारवाई केली. कर्नाटक येथील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई केल्याची माहिती एलसीबीचे पोलिस सतीश शिंदे यांनी दिली.
तिपुराया संगाप्पा बमनोळी (वय २६, रा. करजगी, ता. जत), बसवेश्वर टोपण्णा कदीमनी (वय २६, रा. करजगी, ता. जत), श्रीशैल तमराया हळके (वय ३०, रा. लहान उमदी, ता. जत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कर्नाटक येथील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमाभागात कडक नाकेबंदी, गस्त घालण्याचे आदेश कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिले आहेत. त्यानुसार सांगलीचे पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी सीमाभागात कडक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार यांचे एक विशेष पथक तयार केले होते.
पथकाला कवठेमहांकाळ येथून गुटखा घेऊन दोन ट्रक कर्नाटकात जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून मिळालेल्या माहितीप्रमाणे दोन ट्रकची तपासणी केली. त्यावेळी त्यामध्ये सुगंधी तंबाखू, तसेच गुटखा सापडला. यावेळी तो घेऊन जाणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन ट्रक (क्र. एमएच ०४ ईडी ०४८१, एमएच १२ आरएन ३२०३) जप्त करण्यात आले. तसेच विविध कंपन्यांची सुगंधी तंबाखू, गुटखा असा एकूण सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या तिघांसह मुद्देमाल कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत निशानदार, जितेंद्र जाधव, दीपक गायकवाड, सचिन धोत्रे, संदीप नलवडे यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकारी दत्तात्रय कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.