डान्सबारमध्ये पैसे उधळण्याच्या व्यसनाने उच्चशिक्षित पत्रकाराने केल्या घरफोड्या
ठाणे : खरा पंचनामा
पत्रकारितेचे उच्च शिक्षण घेतले, नोकरीही लागली, मात्र याच दरम्यान डान्सबारमधील बारबालांवर पैसे उधळण्याचे व्यसन जडले. हौस पूर्ण करण्यासाठी एक उच्चशिक्षित पत्रकाराने घरफोडीचा मार्ग निवडल्याने पोलिसही चक्रावून गेले. घरफोड्या करणाऱ्या या पत्रकाराला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रोशन जाधव (वय ३२, रा. डोंबिवली ) असे अटक केलेल्या पत्रकाराचे नाव आहे. महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या तरुणाला अखेर खडकपाडा पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. त्याचे 8 गुन्हे पोलिसांनी उघड केले आहेत. रोशन हा डोंबिवलीतील निलजे गावचा रहिवासी आहे. या तरुणाने पत्रकारितेचे उच्च शिक्षण घेतले असून काही वर्षांपासून तो एका मोठ्या इंग्रजी वृत्तपत्रात काम करत होता. खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहने परिसरात घरफोडी करून अज्ञात आरोपींनी सुमारे 35 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते.
याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच गेल्या महिनाभरापासून या परिसरात घरफोडी, चोरीच्या घटना सातत्याने घडत असून, त्याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. परिसरात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला सापळा रचून अटक केली होती. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ठाणे जिल्ह्यातील मोहने, आंबिवली, टिटवाळा, शहापूर परिसरात दिवसा घरफोडी, चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले. तसेच आरोपी हा रोजचा घरफोडी करणारा चोर असून एकटाच इमारतीत घुसून दिवसा घरफोडी करत असे.
पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सांगितले की, तपासात एकूण 8 गुन्हे उघडकीस आले. त्यामध्ये 47 तोळे सोन्याचे दागिने, 1 लॅपटॉप, 1 मोबाईल फोन, दोन महागडी घड्याळे जप्त करण्यात आली आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.