जत माजी नगरसेवक खून प्रकरण : उमेश सावंतच्या पत्नीला सहआरोपी करा; ताड कुटुंबियांची मागणी
जत : खरा पंचनामा
जत येथील माजी नगरसेवक विजय ताड यांचा भरदिवसा खून करण्यात आला. या घटनेला महिना होत आला, तरी यातील मुख्य सूत्रधार माजी नगरसेवक उमेश सावंत याला पोलिसांनी अद्याप अटक केली नाही. ही बाब संशयास्पद वाटत आहे. त्यामुळे ही यंत्रणा न्याय देईल की नाही, अशी शंका वाटत आहे. तेव्हा हा तपास सीआयडी किंवा एसआयटीकडे देण्यात यावा. ताड यांच्या खुनाच्या कटात उमेश सावंत याची पत्नीचाही सहभाग आहे. त्यामुळे तिला सहआरोपी करा, अशी मागणी मृत ताड यांचे बंधू विक्रम ताड यांनी पत्रकार परिषदेत केली.
ताड म्हणाले, याबाबत आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पोलिस महासंचालकांकडेही दाद मागणार आहे. विजय ताड यांचा दि. १७ मार्च रोजी गोळ्या झाडून व डोक्यात दगड घालून खून केला होता. या खुनानंतर पोलिसांनी चार संशयितांना तात्काळ अटक केली आहे. त्यांनी खुनाची कबुली देऊन सुपारी घेऊन हा खून केल्याचे सांगितले आहे. शिवाय, पहिल्या दिवशीच यात मुख्य सूत्रधार हा उमेश सावंतच असल्याचे आमचेही म्हणणे होते. त्यानुसार तपासातही स्पष्ट झाले आहे. असे असताना आज महिना झाला तरी सूत्रधार सावंत पसार आहे. यामागे काहीतरी काळेबेरे असण्याची शक्यता आता बळावत आहे, असे ताड म्हणाले.
एक महिना होत आला तरी पोलिसांना संशयित मिळत नाही किंवा त्या ताकदीने तपास यंत्रणा काम करत नाही. आमची अशी मागणी आहे की, पोलिसांनी त्यास सहकार्य करणारे, संबंधित राजकीय व्यक्ती, निकटवर्तीय यांची कसून चौकशी केल्यास उमेश सावंतचा शोध ताडतीने लागू शकतो. परंतु, पोलिस यात काहीच करत नाहीत.
शिवाय, हा संशयित अनेक गुन्ह्यात आहे. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर व त्याच्या टोळीवर 'मोक्का' लावण्यात यावा. दरम्यान, संशयित सावंत याला अटक न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, पोलिसांनी आठ दिवसांत त्याला अटक करू, असे सांगून आम्हास थांबवले आहे, तरी अद्याप तपास होत नाही. अनेक गुन्ह्यातील संशयित एका दिवसात पोलिसांना मिळतात. मात्र उमेश सावंत मिळत नसल्याने आमच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आजही आमचे कुटुंबीय दहशतीखाली वावरत आहे. त्यामुळे आता त्यास अटक न केल्यास आम्हाला टोकाचा निर्णय घ्यावा लागेल, ज्याला सर्वस्वी पोलिस यंत्रणा जबाबदार असेल, असेही ताड यांनी स्पष्ट केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.