रजेवर असूनही मुख्यमंत्री शिंदे जाणार अमित शाह यांच्या स्वागताला!
मुंबई : खरा पंचनामा
तीन दिवसांच्या रजेवर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा तालुक्यातील मूळगावी आहेत. मात्र, आता ते अचानक नागपूरकडे जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे बुधवारी सायंकाळी नागपुरात दाखल होणार आहेत. शाह यांचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे नागपूरला जाणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत, असे सांगण्यात येत आहे.
नागपूर शहरातील जामठा येथे राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूट साकारण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. हा समारंभ गुरुवारी सकाळी होणार आहे. या सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान केंद्राद्वारे एनसीआय साकारण्यात आले आहे. याद्वारे कॅन्सरच्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. राज्यासह परराज्यातील अनेक रुग्ण येथे उपचार घेऊ शकणार आहेत. या सोहळ्यासाठी गृहमंत्री अमित शाह हे आज सायंकाळीच नागपुरात दाखल होणार आहेत. त्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे.
यावेळी गृहमंत्री शाह, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात विविध विषयांवर चर्चा होणार असल्याचे सांगितले जाते. राज्यात मुख्यमंत्री बदलाची जोरदार चर्चा आहे. अशातच आता हे तिन्ही नेते भेटणार असल्याने त्यात काही रणनिती ठरणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.