फ्लिपकार्टवरून मोबाईल खरेदी करून हातचलाखीने ते लंपास करणाऱ्या दोघांना अटक
सांगली : खरा पंचनामा
फ्लिपकार्टवरून मोबाईल खरेदी करून हातचलाखीने आलेल्या पार्सल सारखे दुसरे पार्सल तयार करून ते परत देऊन महागडे मोबाईल लंपास करणाऱ्या दोघांना एलसीबीच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून १४ मोबाईल, दोन मोपेड, खाकी पुठ्ठ्यात पॅकिंग केलेल्या दोन साबणाऱ्या वड्यांचे पॅकिंग असा सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
महंमद ऊर्फ जॉर्डन युसूफ इराणी (वय २९), उम्मत युसूफ इराणी (वय २९, दोघेही रा. सह्याद्रीनगर, खोजा कॅलनी, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ऑनलाईन मोबाईल खरेदी करून फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांना दिले होते. त्यानुसार शिंदे यांनी त्याच्या तपासासाठी सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार यांचे एक पथक तयार केले होते.
फ्लिपकार्टवरून मोबाईल खरेदी करून हातचलाखीने ते मोबाईल काढून घेऊन पार्सलमध्ये साबणाची वडी ठेवून फसवणूक करणारे दोघेजण कुपवाड रस्त्यावरील भारत सूतगिरणीजवळ थांबल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ते दोघेही फ्लिपकार्टवर ऑनलाईन मोबाईल बुकिंग करत होते. त्याचे पार्सल आल्यानंतर डिलिव्हरी बॉयला बोलण्यात गुंतवून ते पार्सल बाजूला नेत होते. त्यावेळी त्या पासर्लमधील मोबाईल काढून घेऊन त्या जागी साबणाची वडी ठेवून ते पार्सल पुन्हा आहे तसे पॅक करून डिलिव्हरी बॉयला परत देत होते अशी त्यांनी कबुली दिली. त्यांच्याकडून अशा प्रकारे हातचलाखी करून चोरलेले १४ मोबाईल, दोन मोपेड, खाकी पुठ्ठ्यात पॅकिंग केलेल्या दोन साबणाऱ्या वड्यांचे पॅकिंग असा सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार, उपनिरीक्षक रोहिदास पवार, दीपक गायकवाड, सचिन धोत्रे, चेतन महाजन, संदीप नलवडे, प्रशांत माळी, स्नेहल शिंदे, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.