Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पतसंस्थेत अडीच कोटींचा अपहार करणाऱ्या चेअरमन, व्हाईस चेअरमन, सेक्रेटरिला अटक

पतसंस्थेत अडीच कोटींचा अपहार करणाऱ्या चेअरमन, व्हाईस चेअरमन, सेक्रेटरिला अटक



सांगली : खरा पंचनामा

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बोरगावमधील मारुती ऊर्फ तात्या पाटील पतसंस्थेत 2 कोटी 47 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी संस्थेचा चेअरमन, व्हाईस चेअरमन, सेक्रेटरी यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. वाळवा तालुक्यातील मोठया पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी चेअरमन स्नेहलकुमार मानसिंग पाटील, व्हाईस चेअरमन प्रकाश आनंदराव पाटील, सेक्रेटरी अरविंद जनार्दन पाटील अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अपर लेखापरीक्षक राजेंद्र पाटील यांनी जानेवारी महिन्यात याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या पतसंस्थेबाबत तक्रारी असल्याने अपर लेखापरीक्षक राजेंद्र पाटील यांनी 2017 ते 2021 या काळातील लेखापरीक्षण केले होते.

त्या लेखपरीक्षणात तीनही संशयितांनी संस्थेतील रोख रकमेचा गैरवापर केला, कर्ज वसुलीच्या रकमेत अपहार केला, कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करून ती रक्कम संस्थेत जमा केली नाही, कर्ज रोखे गहाळ केले, कागदपत्रांमध्ये खाडाखोड केली आदी ठपका ठेवण्यात आला आहे.

या लेखपरिक्षणानंतर फिर्यादी राजेंद्र पाटील यांनी दि. 11 जानेवारी रोजी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. मात्र गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला आहे. या शाखेने आज तीन संशयितांना अटक केली आहे.

पोलिस अधीक्षक डॉ. तेली यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महेंद्र दोरकर, अमोल लोहार, इरफान पखाली, उदय घाडगे, कुलदीप कांबळे, विनोद कदम, दीपक रनखांबे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.