Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुख्यमंत्री शिंदे अनऑफिशियल सुट्टीवर?

मुख्यमंत्री शिंदे अनऑफिशियल सुट्टीवर?



मुंबई : खरा पंचनामा

राज्यात सुरु असलेल्या सत्तापालटच्या चर्चांदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसांच्या अनऑफिशियल सुटीवर गेल्याचे समजते. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय येतो याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले असताना राज्यात मुख्यमंत्री बदलाचेही वारे वाहत आहे. त्यातच एकनाथ शिंदे सहकुटुंब त्यांच्या गावी सातारा जिल्ह्यात गेले असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्या या अचानक सुटीवर जाण्याच्या चर्चांनी शिंदे गट आणि भाजपमध्येही सर्वकाही आलबेल नसल्याचेच बोलले जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे कुटुंबिय २४ ते २६ एप्रिल रोजी त्यांचे मुळ गावी सातारा जिल्ह्यात जाणार आहेत. राज्यात राजकीय उलथापालथीची चर्चा सुरु असताना मुख्यमंत्र्यांचा हा सातारा दौरा अनेकांना अचंबित करणारा आहे. एकनाथ शिंदे यांनी एक प्रकारे तीन दिवसांची अनऑफिशियल सुटी घेतली आहे. मुख्यमंत्री अनऑफिशियल सुटीवर गेल्याची अधिकृत माहिती नाही, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर त्यांनी साताऱ्याला जाणार असल्याचे आपल्या स्टाफला सांगितले आहे. मात्र त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर या दौऱ्याबाबतची कोणतीही माहिती नाही.

१६ मार्च रोजी राज्याच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. आता निकालाची उद्धव ठाकरे तसेच शिंदे गटाला प्रतिक्षा लागून राहिली आहे. त्यासोबतच राज्यातील भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही या निकालाकडे डोळे आहेत. दरम्यान शिंदेसह शिवसेनेत बंडखोरी केलेले १६ आमदारही निकालाकडे लक्ष लावून आहेत. अपात्र ठरले, तर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु केल्याची चर्चा आहे. यामुळेच एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे.

भाजपाची राष्ट्रवादी काँग्रेस विशेषतः अजित पवार यांच्यासोबत पडद्याआड सुरु असलेली बातचीत शिंदेना खटकली आहे. तसेच महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या १४ जणांच्या मृत्यूनेही शिंदे व्यथित आहेत. या मृत्यूसाठी विरोधाकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना जबाबदार धरले आहे. तर, हा सोहळा एवढ्या मोठ्या प्रमाणात करण्याची योजना ही त्यांची नसल्याचेही निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. या सर्व घडामोडींमुळे व्यथित झालेले एकनाथ शिंदे तीन दिवसांच्या सुटीवर साताऱ्यात गेले आहेत, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.