सांगलीत महाविद्यालयीन तरूणाचा निर्घृण खून, अवघ्या तासाभरात तिघे संशयित ताब्यात
सांगली : खरा पंचनामा
सांगली-माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा साखर कारखाना परिसरात एका महाविद्यालयीन तरूणावर कुकरी सदृश्य हत्याराने मानेवर, छातीवर वार करून त्याचा खून करण्यात आला. गुरुवारी सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान ही घटना घडली. खुनाची माहिती मिळताच संजयनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षिरसागर तातडीने घटनास्थळी पोहोचले. तपासाची चक्रे वेगाने फिरवत यातील तीन संशयितांना अवघ्या तासाभरात ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.
राजवर्धन राम पाटील (वय १८, सध्या. रा. बुधगाव, मूळ रा. मतकुणकी, ता. तासगाव) असे मृत तरूणाचे नाव आहे. राजवर्धन वसंतदादा औद्योगिक वसाहतीतील शासकीय आयटीआयमध्ये शिकत होता. बुधवारी महाविद्यालयात त्याचा काही तरूणांशी एकमेकांकडे पाहण्यावरून वाद झाला होता. गुरुवारी हा वाद पुन्हा उफाळून आला. संशयितांनी त्याचा माग काढत गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्याला वसंतदादा कारखान्याच्या मुख्य कमानीजवळ गाठले.
यावेळी संशयितांनी त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राजवर्धन कारखान्याच्या दिशेने पळाला. संशयितांनी त्याचा पाठलाग करून कुकरी सदृश्य हत्याराने त्याच्या मानेवर तसेच छातीवर वमीर् घाव घातले. राजवर्धन रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर संशयित तेथून निघून गेले. याची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगलीच्या शासकीय रूग्णालयात हलवण्यात आला आहे.
दरम्यान पोलिसांनी राजवर्धन याच्या मित्रांकडे चौकशी केल्यानंतर बुधवारी त्याचा काही तरूणांशी वाद झाल्याची माहिती मिळाली. शिवाय त्याच्यावर हल्ला करणारे तरूण अनोळखी होते असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत घटनेनंतर अवघ्या तासाभरात तीन संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते. त्यांच्याकडे पोलिस कसून चौकशी करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.