Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

साखर आयुक्त कार्यालयावर ट्रॅक्टरसह धडक देणार : राजू शेट्टी

साखर आयुक्त कार्यालयावर ट्रॅक्टरसह धडक देणार : राजू शेट्टी



सांगली : खरा पंचनामा

राज्यातील ऊस वाहतुकदारांची कोट्यवधीची फसवणूक होत असताना साखर संघ, पोलिस खाते काय करते? ऊस वाहतुकदारांच्या प्रश्नांसाठी प्रसंगी पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर ट्रॅक्टरसह धडक देऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी दिला.

सांगलीतील तरुण भारत क्रीडांगणावर ऊस वाहतुकदारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेट्टी बोलत होते. विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. रॅलीचे रुपांतर मेळाव्यात झाले. यावेळी भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार, संदीप राजोबा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, साखर उद्योगात वाहतुकदारांना कुठेच स्थान नाही. साखर कारखानदारांनी वाहतुकदारांचा स्वार्थासाठी वापर केला. वाहतूकदार संघटना काढून कोट्यवधीचे घोटाळे केले. पण वाहतुकदारांची फसवणूक होताना त्यांची जबाबदारी घेतली नाही. साखर संघानेही तेच केले. साखर संघाचे अध्यक्ष तर सांगली जिल्ह्यातील आहेत. त्यांना भेटण्यास वेळ नाही. वाहतुकदारांनी मनात आणले तर साखर संघालाही गुडघे टेकण्यास भाग पाडू शकतात. त्यांनी ऊसाची वाहतुक करायची नाही, असे ठरविले तर कारखानदार त्यांच्या आलिशान गाड्यातून ऊस आणणार आहेत का?
ऊस वाहतुकदार एकवटल्याने शासनालाही जाग आली आहे. फसवणूक करणाऱ्या मुकादमावर गुन्हे दाखल होत आहेत. पण यावर न थांबता शासनाने अध्यादेश काढावा, ऊस वाहतुकदारांच्या मागण्याची पूर्तता करावी, यासाठी प्रसंगी साखर आयुक्त कार्यालयावर ट्रॅक्टरसह धडक देऊ, असेही शेट्टी म्हणाले.

पृथ्वीराज पवार म्हणाले, ऊस वाहतुकदारांची संघटना उभारल्याने शासनपातळीवर किमान त्यांच्या प्रश्नांची चर्चा सुरू झाली आहे. साखर संघाने यात भूमिका घेण्याची गरज आहे. पण ते गप्प आहेत. त्यांच्याविरोधात लढा द्यावा लागेल.
प्रारंभी अजित राजोबा यांनी स्वागत केले. संदीप राजोबा यांचे भाषण झाले. 

मेळाव्याला सुनील शिष्टे, विनोद पाटील, सुदर्शन मद्वण्णा, राहूल सकळे, रावसाहेब पाटील, गणेश गावडे, डाॅ. अनिल कन्नुरे, दिग्विजय जगदाळे, रावसाहेब आबदान, श्रीकृष्ण पाटील, शिवाजी पाटील यांच्यासह ऊस वाहतुक उपस्थित होते.

दोन वर्षात साडेचारशे कोटीची फसवणूक
गेल्या दोन वर्षात १० हजार २५८ मुकादमांनी ४४८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची आकडेवारी साखर संघाकडे आहे. यावर राज्याचे गृहखाते, पोलिस काय करते? पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा राजू शेट्टींनी दिला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.