कारची रोड रोलरला धडक : दोन ठार, चौघे जखमी
कोल्हापूर : खरा पंचनामा
रस्त्याकडेने चाललेल्या रोडरोलरला मारुती कारने पाठीमागून जोराची धडक दिल्याने दोन जण ठार तर चौघे गंभीर जखमी झाले. घुणकी फाट्याजवळ शनिवारी सकाळी हा भीषण अपघात झाला.
राहुल शिखरे (वय ३० रा. मिणचे) व सुयोग पवार (वय २८ रा. टोप) अशी मृतांची नावे आहेत. सुनील कुरणे (वय २४), वैभव चौगुले (वय २३ रा. टोप), अनिकेत जाधव(वय २२) निखिल शिखरे (वय २७, रा. मिणचे) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
टोप, शिये व मिणचे येथील डॉल्बी, लेजर लाईट व डेकोरेशन क्षेत्रात काम करणारे सहाजण मुंबई येथे त्यांच्या कामासंदर्भातील प्रदर्शन बघण्यासाठी गेले होते. प्रदर्शन पाहून रात्री अकराच्या दरम्यान ते मुंबई येथील मारुती कारने (क्र. एमएच ४८ एके ६५४५) परतण्यासाठी निघाले.
पहाटे साडेसहाच्या दरम्यान घुणकी फाट्याजवळ किणी टोल नाक्याच्या दिशेने चाललेल्या रोड रोलरला कारने जोराची धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की धडकेने रोडरोलर रस्त्यावर उलटला तर कारचा पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघात होताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तसेच महामार्गावरील प्रवाशानी तातडीने बचावकार्य सुरू केले. अपघातात गंभीर जखमी झालेल्याना तसेच रोलर चालक दादासो दबडे (वय ४०, रा. वाठार) यांनाही उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. सुयोग पवार व राहुल शिखरे यांचे उपचारापूर्वीच निधन झाल्याचे घोषित करण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.