वडणगेत दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू
कोल्हापूर : खरा पंचनामा
वडणगे (ता. करवीर) येथील एका दाम्पत्याचा बुधवारी सकाळी संशयास्पदरीत्या मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर काही वेळातच रिअॅक्शन आल्याने दोघांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज कदम दाम्पत्याच्या मुलींनी वर्तवला आहे.
मधुकर दिनकर कदम (वय ५९) आणि जयश्री मधुकर कदम ( ४९, दोघे रा. दिंडे कॉलनी, वडणगे) अशी मृतांची नावे आहेत. दोघांचा व्हिसेरा राखून ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली. मूळचे शिवाजी पेठेतील मधुकर कदम हे त्यांची पत्नी आणि दोन मुलींसह वर्षभरापूर्वीच वडणगे येथील नवीन घरात राहायला गेले होते.
एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेले कदम यांना मधुमेहाचा त्रास सुरू होता. त्यांची पत्नी जयश्री यांनाही काही दिवसांपासून मधुमेहाचा त्रास सुरू होता. दोघांनी १५ दिवसांपूर्वीच मुक्त सैनिक वसाहत परिसरातील एका डॉक्टरकडून आयुर्वेदिक औषध घेतले होते. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास दोघांनीही औषधी पावडर पाण्यात मिसळून प्राशन केली. त्यानंतर मधुकर कदम हे दूध आणण्यासाठी बाहेर गेले, तर जयश्री या स्वयंपाक करत होत्या. काही वेळातच जयश्री यांना अस्वस्थ वाटू लागले. श्वासोच्छवासास त्रास होऊ लागला. त्यानंतर त्या बेशुद्ध पडल्या.
दरम्यान, दूध आणण्यासाठी गेलेले मधुकर कदमही दूध डेअरीजवळच्या चौकात चक्कार येऊन पडल्याचे नागरिकांना आढळले. परिसरातील नागरिकांनी तातडीने कदम दाम्पत्यास शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, बाहेरच तपासणी करून त्यांनी रुग्णांना सीपीआरमध्ये पाठवले. सीपीआरमधील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांचाही मृत्यू झाल्याचे जाहीर केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.