कवठेपिरान येथे दरोडा : दोन लाखांची रोकड, १५ तोळ्यांचे दागिने लंपास
सांगली : खरा पंचनामा
मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथे शुक्रवारी मध्यरात्री तीन ते चार जणांनी एकाच्या घरात घुसून दोन लाखांची रोकड तसेच १५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल लंपास केला. घटनास्थळी सांगली ग्रामीण पोलिसांसह एलसीबी तसेच वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी धाव घेतली आहे. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
सांगली-कवठेपिरान रस्त्यावर रफीक दस्तगीर मगदूम यांचे एका गल्लीत घर आहे. त्यांची मुलगी तरन्नूम शिफा मुजावर नातेवाईकांच्या लग्नासाठी माहेरी आली आहे. मगदूम यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी त्यांनी बॅंकेतून रोकड काढून आणली होती. शिवाय त्यांची मुलगी तरन्नूम दागिने घेऊन माहेरी आली आहे. घराचे बांधकाम सुरू असल्याने तेथेच शेजारी झोपडीवजा घरात मगदूम कुटुंब रहात आहे.
शुक्रवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास दोघेजण त्यांच्या घरात घुसले. त्यानंतर मगदूम तसेच त्यांच्या घरातील लोकांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी त्यांना दगडाचा धाक दाखवत गप्प बसवले. त्यानंतर त्यांना धमकावत घरातील दोन लाखांची रोकड आणि तरन्नूमचे १५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. दरम्यान दोघे घरात चोरी करत असताना दोघेजण मगदूम यांच्या घराबाहेर थांबले होते असे सांगण्यात आले. यावेळी चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत तरन्नूम किरकोळ जखमी झाली आहे.
कवठेपिरान येथे दरोडा पडल्याची माहिती मिळाल्यानंतर सांगली शहरचे प्रभारी पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिलडा, एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सांगली ग्रामीणचे पोलिस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्यासह एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर जिल्ह्यात नाकाबंदी करून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र चोरटे सापडले नाहीत. घटनास्थळी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. शिवाय श्वान पथकही दाखल झाले असून चोरट्यांचा माग काढला जात असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.