सांगलीतील संतापजनक घटना : मुलाने वडिलांना ट्रॅक्टर खाली चिरडून मारले!
मिरज : खरा पंचनामा
मिरज तालुक्यामधील बेडग येथे एकाने वडिलांना ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारले. बुधवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी नराधम मुलाला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दाजी गजानन आकळे (वय 70) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी संशयित मुलगा लक्ष्मण आकळे (वय 32) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वडील पैसे देत नसल्याने तसेच जमीन नावावर करीत नसल्याने मुलाने वडिलांना ट्रॅक्टर खाली चिरडून ठार मारले असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
लक्ष्मण आणि त्याचे वडील दाजी आकळे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसापासून पैसे आणि जमीन नावावर करण्यावरून वाद सुरू होता. लक्ष्मण हा वडील दाजी यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी करीत होता. तसेच जमीन नावावर करण्यासाठीही त्याने तगादा लावला होता. पैसे देण्यास तसेच जमीन नावावर करून देण्यास वडिलांनी विरोध केला.
त्याचा राग आल्याने लक्ष्मण याने वडिलांना बुधवारी सकाळी ट्रॅक्टर खाली चिरडून मारले. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी लक्ष्मण याला ताब्यात घेतले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.