कोल्हापूरच्या सीपीआरमध्ये सुरक्षा रक्षकावर चाकूहल्ला : इस्लामपूरचा तरुण जखमी
कोल्हापूर : खरा पंचनामा
येथील सीपीआर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर गाडी आत न सोडल्याने सुरक्षा रक्षकावर चाकूने हल्ला करण्यात आला. यामध्ये इस्लामपूर (जि. सांगली) येथील तरुण गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.
महाराष्ट्र सुरक्षा दलाचा जवान पवन संजय कदम (वय २६, रा. इस्लामपूर, जि. सांगली) असे जखमीचे नाव आहे. हल्यानंतर संशयित पसार झाला. तो सीपीआरमधील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पथकातील जवान प्रवेशद्वारासह प्रथमोपचार केंद्रात तैनात असतात. या वेळेत रुग्णांशिवाय नातेवाईक व नागरिकांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. संशयित सकाळी १० वाजता सीपीआरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दुचाकीवरून आला. जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला अडवल्यानंतर तो मी कोण आहे माहीत नाही...? मला आत सोडा, असे मोठा आवाज करून सांगण्याचा प्रयत्न केला.
जवानांनी त्याला जुमानले नाही. त्यावर संशयिताने दुचाकी भिंतीजवळ उभी केली. जखमी पवनला उद्देशून तुला ठार मारतो, अशी धमकी देवून रुग्णालय आवारात असलेल्या घराच्या दिशेने पळत सुटला. दहा पंधरा मिनिटांनंतर धारदार चाकू घेवून संशयित प्रवेशद्वारावर आला. पवनसह कर्तव्य बजावत असणाऱ्या जवानांवर त्याने चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. हल्ला चुकविण्याच्या प्रयत्नात पवनच्या हाताला इजा झाली. कमरेला तसेच पोटाजवळही दुखापत झाली.
त्यानंतर सुरक्षा रक्षकांसह काही नागरिक हल्लेखोराला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पळून गेला. याची प्राथमिक नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.