Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुलाप्रमाणे सांभाळ करणाऱ्या चुलतीचा पुतण्याने केला खून! माधवनगरमधून नेऊन खून करून मृतदेह पुरला

मुलाप्रमाणे सांभाळ करणाऱ्या चुलतीचा पुतण्याने केला खून!
माधवनगरमधून नेऊन खून करून मृतदेह पुरला



सांगली : खरा पंचनामा

गेली 15 वर्षे मुलाप्रमाणे सांभाळ करणाऱ्या चुलतीचा पुतण्याने निर्घृणपणे खून केला. खून केल्यानंतर मृतदेह मिरज तालुक्यातील सलगरे येथील म्हैसाळ योजनेच्या 5 व्या टप्प्याजवळ पुरला. मंगळवारी दुपारी यातील संशयित पुतण्या स्वतः संजयनगर पोलिस ठाण्यात हजर झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

गौरी जिनपाल गोसावी (वय 35, रा. अहिल्यानगर) असे मृत महिलेचे नाव आहे. तर निहाल सतपाल गोसावी (वय 20) असे संशयिताचे नाव आहे. निहाल 8 वर्षांचा असल्यापासून गौरीने त्याचा मुलाप्रमाणे सांभाळ केला होता. निहाल हा गौरीचा पुतण्या आहे.

गौरीला त्याने सोमवारी सकाळी लवकर माधवनगर येथून स्वतःच्या कारमध्ये बसवले. त्यानंतर निहाल तिला घेऊन सलगरे येथील म्हैसाळ योजनेच्या टप्पा क्रमांक 5 येथे घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर त्याने तिचा खून करून मृतदेह तेथेच पुरला. सोमवारी सकाळपासून गौरी गायब असल्याने तिच्या नातेवाईकांनी ती बेपत्ता झाल्याची फिर्याद संजयनगर पोलिस ठाण्यात दिली.

त्यानंतर मंगळवारी दुपारी निहाल स्वतःहून संजयनगर पोलिस ठाण्यात हजर झाला. त्यावेळी त्याने गौरीचा खून करून तिचा मृतदेह म्हैसाळ योजनेच्या 5 व्या टप्प्याजवळ पुरल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी त्याला ताब्यात घेऊन पूर्ण घटनेची माहिती घेतली. मृतदेह पुरल्याची जागा समजल्यानंतर निरीक्षक मोरे यांनी कवठेमहांकाळचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्याशी संपर्क साधला.

निरीक्षक श्री. मोरे, श्री. शहाणे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पुरलेला मृतदेह बाहेर काढला. रात्री उशिरा उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला आहे. पोलिस तपास सुरू असून रात्री उशिरापर्यंत खुनाच्या गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.

अनैतिक संबंध असल्याने खून केला
दरम्यान निहाल पोलिस ठाण्यात हजर झाल्यानंतर पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने गौरीचे अनैतिक संबंध असल्याने राग आला होता असे सांगितले आहे. मात्र पोलिस खुनाच्या नेमक्या कारणांचा शोध घेत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.