फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सोन्याच्या विटा लंपास करणारी कोल्हापुरातील टोळी जेरबंद
पुणे : खरा पंचनामा
सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे कुरियर सातारा येथून पुण्याकडे घेऊन निघालेल्यांचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सोन्या-चांदीच्या विटा लंपास करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आले आहे. ही टोळी कोल्हापूर जिल्ह्यातील असून त्यांच्याकडून 24 लाख 72 हजार 820 रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पुणे ग्रामीणच्या एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.
सरफराज सलीम नदाफ (वय 34), मारूती लक्ष्मण मिसाळ (वय 31, दोघे रा. कुंभोज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), सुरज बाजीराव कांबळे (24), करण सायजी कांबळे (23, दोघे रा. सावर्डे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), गौरव सुनिल घाडगे (23, रा. मिणचे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
फिर्यादी त्यांच्या ताब्यातील सोन्या- चांदीच्या दागिन्यांचे पार्सल घेवुन साताऱ्याहून पुण्याकडे निघाले होते. सातारा तालुक्यातील मौजे काशिळ गावाच्या हद्दीतील ब्रिजवर संशयितांनी फिर्यादी आणि इतरांच्या तोंडावर कोणता तरी स्प्रे मारून त्यांच्या ताब्यातील दागिने लुटले होते. संशयित यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुणे- सोलापूर रस्त्यावरून इनोव्हा गाडीतून जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेंडगे यांना मिळाली. पुणे ग्रामीणचे एलसीबीचे आणि यवत पोलिसांच्या पथकाने कासुर्डी टोलनाका येथे नाकाबंदी केली. त्यावेळी संशयितांना पाठलाग करून पकडण्यात आले.
पोलिसांनी चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी 18 किलो 500 ग्रॅम वजनाचे चांदी आणि 79.45 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच गुन्हयात वापरलेली इनोव्हा गाडी, छऱ्याचे पिस्तुल, चाकु, मोबाईल असा एकुण 24 लाख 72 हजार 820 रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. संशयितांना सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.