Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ट्रॅव्हल्स-कारच्या धडकेत चौघे जागीच ठार; विटा-नेवरी रस्त्यावर भीषण अपघात : सर्व मृत मुंबईतील

ट्रॅव्हल्स-कारच्या धडकेत चौघे जागीच ठार; विटा-नेवरी रस्त्यावर भीषण अपघात : सर्व मृत मुंबईतील



सांगली : खरा पंचनामा

भरधाव ट्रॅव्हल्स आणि कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात कारमधील चौघे जागीच ठार झाले. गुरुवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास विटा-नेवरी रस्त्यावर हा भीषण अपघात झाला. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. कारमधील एअरबॅग उघडल्याने एकजण आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. अपघाताची माहिती मिळताच विटा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. अपघातातील सर्व मृत मुंबई येथील असल्याचे सांगण्यात आले. 

योगेश विलास कदम (वय 35, रा. बोरिवली, मागाठाणे, मुंबई), सुनिता सदानंद काशिद (वय 61), चंद्रकांत दादोबा काशिद (वय 62), अशोक नामदेव सुर्यवशी (वय 64, रा. नोबेल हाईट, संतोषी माता मंदिराजवळ, भारत बँकेच्या समोर, कुरार मालाड पुर्व, मुंबई) अशी या अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर सदानंद दादोबा काशीद जखमी झाले आहेत.
सदानंद दादोबा काशिद (वय 69, रा. 504 नोबेल हाईट, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी ट्रॅव्हल्सचा चालक दिपक आबासो पाटील (रा बोरगाव, ता. तासगाव, जि. सांगली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी सकाळी एक ट्रॅव्हल्स (क्र. एआर ०१ जे ८४५२) विट्याहून महाबळेश्वर रस्त्यावरून भरधाव वेगाने साताऱ्याच्या दिशेने निघाली होती. विट्यापासून थोड्या अंतरावर असलेल्या शिवाजीनगर येथे समोरून येणाऱ्या एका कारने (एमएच ४७ केजी ९५४) ट्रॅव्हल्सच्या चालकाच्या बाजूला जोराची धडक दिली. कारमधून पाचजण प्रवास करत होते. 

भरधाव कारने ट्रॅव्हल्सला दिलेली धडक इतकी भीषण होती की कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालकाशेजारी बसलेले सदानंद काशीद वेळीच एअरबॅग उघडल्याने आश्चयर्कारकरित्या बचावले. या अपघातात ट्रॅव्हल्समधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच विटा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. यातील जखमींना तातडीने विट्यातील रूग्णालयात हलवण्यात आले. तर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ग्रामीण रूग्णालयात हलवण्यात आले. 

पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवल्याने वाहतूक सुरळीत झाली. याबाबत विटा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संतोष डोके अधिक तपास करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.