Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

परवाना नूतनीकरणच्या 'खुशी'च्या वसुलीसाठी संघटनेकडून खास व्यक्तींची नियुक्ती! लाचलुचपतच्या सापळ्यातुन वाचण्यासाठी नवीन आयडिया!

परवाना नूतनीकरणच्या 'खुशी'च्या वसुलीसाठी संघटनेकडून खास व्यक्तींची नियुक्ती!
लाचलुचपतच्या सापळ्यातुन वाचण्यासाठी नवीन आयडिया!



सांगली : खरा पंचनामा

बहुतांशी शासकीय कार्यालयांचे मार्चचे टार्गेट पूर्ण झाले आहे. एका शासकीय विभागातील परवाना नूतनीकरण केल्यानंतर लायसेन्सिकडून (परवानाधारक) मिळणाऱ्या 'खुशी'च्या वसुलीसाठी आता नवीन आयडिया आणली आहे. सांगली जिल्ह्यात याची जोरदार चर्चा आहे. काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या वसुलीसाठी विशेष व्यक्तीची नियुक्ती केली आहे. अधिकाऱ्यांना लाचलुचपतच्या जाळ्यातून वाचण्यासाठी ही आयडिया वापरण्यात येत आहे. मात्र यामध्ये जिल्ह्याचा प्रमुख अधिकारी विनाकारण बदनाम होत असल्याचीही चर्चा आहे.

शासनाच्या सर्वच विभागांनी मार्च एन्डचे टार्गेट जवळपास पूर्ण केले आहे. नुकतेच एका विभागाच्या परवाना नुतनीकरणासाठी शुल्क वाढवण्यात आले होते. मार्च एण्ड जवळ आल्यानंतर ते काही टक्क्यांनी कमी करण्यात आले. त्यानंतर परवाना नुतनीकरणासाठी लायसेन्सिची (परवानाधारक) धावपळ सुरू झाली.

दरवर्षी दिवाळीप्रमाणे परवाना नूतनीकरण झाल्यानंतर त्या भागातील अधिकाऱ्यांना 'खुशी' दिली जाते. शिवाय भागातील कर्मचारी, मुख्य कार्यालयातील लिपिक, शिपाई यांच्यापर्यंत ही 'खुशी' पोहोचवली जाते. मोठ्या आणि वरिष्ठ साहेबांनाही ती पोहोचवली जाते असा रिवाज असल्याची चर्चा आहे. मात्र सोलापुरात एक निरीक्षक, एक सहायक दुय्यम निरीक्षक आणि एक कॉन्स्टेबल तर छत्रपती संभाजीनगर येथे एका निरीक्षकला याच परवाना नुत्नीकरणाची खुशी घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

याची धास्ती सांगली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी घेतली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यातून वाचण्यासाठी आता संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या प्रमुख अधिकाऱ्याचे नाव सांगत ही खुशी गोळा करण्याचे काम काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर सोपवले आहे. 

या पदाधिकाऱ्यांनी 'खुशी' गोळा करण्यासाठी इस्लामपूर, जत, आटपाडी, सांगली, मिरज, तासगाव, विटा, कडेगाव, कवठेमहांकाळ आदी भागात त्यांचे पंटर (विशेष व्यक्ती) नेमले आहेत. ही खुशी दरवर्षी बिनबोभाटपणे दिली-घेतली जात होती. मात्र यावर्षी सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे संघटनेचे पदाधिकारी पंटरमार्फत ही वसुली करत असल्याची चर्चा आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.