Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्रातून कर्नाटकात दारूची तस्करी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धंदा जोमात एक्साईजचे नोडल ऑफिसर, चेक पोस्ट नावालाच!

महाराष्ट्रातून कर्नाटकात दारूची तस्करी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धंदा जोमात 
एक्साईजचे नोडल ऑफिसर, चेक पोस्ट नावालाच!



सांगली : खरा पंचनामा

कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. प्रचार टिपेला पोहोचला आहे. विविध पक्षांकडून मतदारांना अनेक प्रलोभने दाखवली जात असल्याची चर्चा आहे. यावेळी मात्र कर्नाटकपेक्षा महाराष्ट्रातील दारूची किंमत कमी असल्याने महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कर्नाटकात दारूची तस्करी केली जात आहे. ही तस्करी रोखण्यासाठी एक्साईजचे नोडल ऑफिसर आणि त्यांचे चेक पोस्ट नावालाच असल्याचे दिसून येत आहे.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी संपूर्ण सीमाभागातील रस्त्यावर तपासणी नाके उभारून कडक वॉच ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी सीमाभागातील रस्त्यांवर तपासणी नाके उभारून गस्त सुरू केली आहे. श्री. फुलारी यांनी उत्पादन शुल्क विभागाशी समन्वय साधून अवैध दारू तस्करीवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. मात्र यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग कमी पडताना दिसत आहे. सीमाभागात अनेक ठिकाणी पोलिसांचे तपासणी नाके आहेत.

या तपासणी नाक्यावर एक्साईजचे अधिकारी, कर्मचारी दिसत नाहीत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्र राज्याच्या संचालकांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र एक्साईजच्या चेक पोस्ट, कारवाई याबाबत माहिती घेण्यासाठी त्यांना तसेच त्यांच्या कार्यालयात फोन केला असता त्याला प्रतिसाद देण्यात आला नाही. कोल्हापूर विभागाचे उपायुक्तही चेक पोस्ट तपासणी करत असल्याने त्यांच्याशीही संपर्क होऊ शकला नाही.

याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्तांना फोन केला असता त्यांनीही फोन उचलला नाही. मग मंत्रालयात या विभागातील उप सचिवांना फोन केला असता त्यांनी संचालक आणि कर्नाटक निवडणुकीसाठी नोडल ऑफिसर यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. मात्र त्या संचालकांना वारंवार फोन करूनही त्यांनी उत्तर दिले नाही.

दरम्यान सध्या कर्नाटकात महाराष्ट्र राज्यातील दराहून अधिक किमतीला अधिकृतपणे दारूची विक्री केली जाते. शिवाय तेथे देशी दारू विक्रीला बंदी आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कर्नाटकात दारूची तस्करी केली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही तस्करी राज्य उत्पादन शुल्क विभाग थांबवणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्रातील सीमाभागात पोलिसांचे तपासणी नाके असले तरी तेथे एक्साईजचे लोक नसल्याने अनेकदा कारवाईत अडचणी निर्माण होत असल्याची चर्चा होत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.