उसने दिलेले 2 हजार परत मागितल्याने भाजीविक्रेत्याचा खून
कसबेडिग्रज येथील घटना : संशयिताला हातकणंगलेमधून अटक
सांगली : खरा पंचनामा
कसबेडिग्रज (ता. मिरज) येथील भाजीविक्रेत्याचा चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला. उसने दिलेले 2 हजार रुपये परत मागितल्याने संशयिताने हा खून केला. सोमवारी रात्री कसबेडिग्रज येथील बाजारात ही घटना घडली. यातील संशयिताला हातकणंगले (जि. कोल्हापूर) येथून अटक करण्यात आली आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीधर उर्फ चेंग्या जगन्नाथ जाधव (कसबेडिग्रज) असे संशयिताचे नाव आहे. तर पांडुरंग रघुनाथ कुंभार (वय ३२, मारूती मंदिराजवळ, कसबेडिग्रज) असे मृताचे नाव आहे.
मृत पांडुरंग कुंभार याचा भाऊ बालमुकुंद कुंभार यांनी फिर्याद दिली आहे.
पांडुरंग कुंभार हे कसबेडिग्रज येथील मारूती मंदिराजवळ कुटुंबासह राहतात. त्यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. संशयित श्रीधर जाधव हा त्यांचा मित्र होता. तो एका फौंड्रीत कामगार म्हणून काम करतो. कुंभार यांनी त्याला काही दिवसांपुर्वी दोन हजार रूपये उसने दिले होते.
दरम्यान, काल रात्री अकरा ते सव्वा अकराच्या सुमारास दोघे गावातील हॉटेल शिलेदार येथे भेटले. कुंभार यांनी उसन्या पैशांची मागणी केली. जाधवला राग आला.
दोघांत बाचाबाची झाली. वाद टोकाला गेल्यानंतर जाधवने चाकूने कुंभार यांच्या पोटात वार केला. वार वर्मी असल्याने कुंभार रक्ताच्या थारोळ्यात पडले. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. एकच वार पण वर्मी बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.
पोलिस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, ग्रामीणचे निरीक्षक शिवाजीराव गायकवाड, सहायक निरीक्षक प्रदीप शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सांगलीतील सिव्हिलमध्ये उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
संशयित श्रीधर जाधवने घटनेनंतर पळ काढला. हातकणंगले (जि. कोल्हापूर) येथे संशयित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तातडीने पहाटे चारच्या सुमारास अटक करण्यात आली. निरीक्षक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार संतोष माने, मेघराज रूपनर, सुनील कदम, विष्णू काळे, तानाजी वंजारी, बंडू पवार, मनिषा कोरे यांनी ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.