कमी किमतीत सोन्याच्या आमिषाने 25 लाख लुटणाऱ्या चौघांना अटक!
2 महिलांचा समावेश, साडेबारा लाखांची रोकड जप्त : एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
मिरज तालुक्यातील धामणी रस्त्यावर भर दुपारी पुण्यातील व्यापाऱ्यास कमी किमतीत सोने देण्याच्या आमिषाने 25 लाख लुटणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली. यामध्ये 2 महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून साडेबारा लाखांची रोकड, एक चारचाकी गाडी जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
मानसी सुरेश शिंदे (वय ३०, रा.कोथरुड पुणे), प्रशांत भुंजगराव निबांळकर (४८ रा. बुलढाणा), प्रवीण महादेव खिराडे (३७, रा. बुलढाणा ) आणि नम्रता शरद शिंदे (२८, रा. पुणे ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात मयूर सुभाष जैन (रा. सुमंगल अपार्टमेंट, मोतीबाग, शिवाजीनगर पुणे) यांनी अशोक रेड्डी याच्यासह अन्य पाच अनोळखी विरोधात फिर्याद दिली होती.
पुण्यात मयूर जैन यांचा स्टील, सिमेंट याचा व्यवसाय आहे. त्यांचा मित्र असलेल्या सचिन काळभोर याची संशयीत अशोक रेड्डी सोबत ओळख आहे. काळभोर याला रेड्डी याने कमी दरात सोने हवे असल्यास संपर्क साधण्यास सांगितले होते. याची माहिती काळभोर याने जैन यांना दिली. सोने खरेदी करण्याचे नक्की झाल्याने जैन याने अशोक रेड्डी याला पुण्यात बोलावले. परंतु सध्या वारी सुरु असल्याने रस्त्यावर गर्दी असल्याचे कारण देत रेड्डी आणि त्याच्या साथीदारांनी पुण्यात येणे टाळले.
त्यानंतर मंगळवारी सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील फळ मार्केट परिसरात सोने विक्रीकरता भेटायचे निश्चित झाले. त्यानुसार चारचाकीने जैन यांच्यासह त्यांचे तीन मित्र सकाळी दहा वाजता घटनास्थळी आले. त्यांनी संशयीत रेड्डीला फोन केला असता त्याने समोरील चहाच्या टपरीवर एक इसम थांबला असून त्याला भेटण्यास सांगितले.
जैन आणि काळभोर यांनी सदर व्यक्तीची भेट घेतली असता जवळच थांबलेल्या चारचाकीमध्ये बसलेल्या त्याच्या साथीदारांनी जैन यास सोन्यासारखी दिसणारी बिस्किटे दाखविली. पैसे घेवून या आणि बिस्किटे घेवून जा असे त्यांनी जैन यास सांगितले. दरम्यान रेड्डी घटनास्थळी आला. त्या कालावधीत जैन हे दोन प्लॅस्टिकच्या पिशवीमधून प्रत्येकी साडे बारा लाख रुपये घेवून रेड्डीकडे निघाले होते. त्याचवेळी तोतया पोलीस तेथे आले. त्यांनी पोलिस असल्याची बतावणी केली. घाबरलेल्या जैन यांच्याकडील २५ लाख रुपये घेवून ते पसार झाले.
काही वेळाने रेड्डी याने फोनवरुन जैन यांना सोन्याची बिस्कीटे घेण्यासाठी बसस्थानकावर थांबण्यास सांगितले. परंतु बराच वेळ थांबूनही कोणीच न आल्याने फसवणूक झाल्याचे जैन यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने सांगली शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच सांगली एलसीबीच्या पथकाने पोलिसांनी सातारा येथील पोलिसांशी संपर्क साधून त्यांना घटनेची कल्पना दिली. आणेवाडी टोलनाका परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने संशय आल्याने चारचाकीतील चौघांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांच्याकडून हा गुन्हा उघडकीस आला. टोळीतील अन्य काहीजण पसार झाले आहेत.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार, सातारा जिल्ह्यातील भुईंजचे सहायक निरीक्षक रमेश गर्जे, सांगली एलसीबीकडील दिपक गायकवाड, कुबेर खोत, सचिन धोत्रे, सुनिता शेजाळे, संदिप नलवडे, संदिप गुरव, अनिल कोळेकर, बाळू सुतार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.