कोल्हापुरातील 'त्या' 4 पोलिसांची होणार चौकशी!
कोल्हापूर : खरा पंचनामा
शहरातील राजेंद्रनगर परिसरात जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर जुगार खेळणाऱ्या दोन तरुणांनी इमारतीवरुन उडी घेतल्यानंतर एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा तरुण जखमी झाला होता. आता या प्रकरणी, राजेंद्रनगरमध्ये छापा टाकण्यासाठी गेलेल्या चौघा पोलिसांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. जोपर्यंत चौकशी सुरू आहे आणि पुढील आदेश होत नाही, तोपर्यंत चारही पोलिसांना पोलिस मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले आहेत.
या घटनेवेळी साहिल मिनेकर याचा मृत्यू झाला, तर दत्तात्रय देवकुळे या तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. राजेंद्रनगरमध्ये रविवार दि. 18 जून रोजी ही घटना घडली होती.
या छाप्याची चौकशी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक पंडित यांनी शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांना दिले आहेत. राजारामपुरी पोलिस ठाण्यातील विशाल शिरगावंकर, सत्यजित सावंत, विशाल तळेकर, संदीप सावंत यांनी रविवारी रात्री राजेंद्रनगरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी छाप्याच्या भीतीने तरुणाने इमारतीवरून खाली उडी घेतली. यात त्याचा मृत्यू झाला. तर दुसरा तरुण जखमी झाला.
हा छापा पडला, तेव्हा नेमकी वस्तुस्थिती काय आहे, यामध्ये पोलिसांचा काही संबंध आहे का? त्यांची काय चूक आहे का? याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीमध्ये कोठेही अडथळे येवू नयेत, ती पारदर्शी व्हावी, म्हणून चारही पोलिसांची नियुक्ती मुख्यालयात केली असल्याचेही अधीक्षक पंडित यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.