कवठेपिरान दरोडा : एकाला अटक, 4 लाखांचे दागिने जप्त
सांगली : खरा पंचनामा
मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथे दरोडा टाकून दागिने, रोकड असा 8.71 लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून चार लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. एलसीबी आणि सांगली ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.
काक्या सरपंच काळे (रा. चिकूर्डे, ता. वाळवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्यासह टारगेट ऊर्फ विशाल शिंदे (रा. वांगी, जि. सोलापूर), करण शेऱ्या भोसले (रा. माळेगाव, बारामती) आणि त्याचे तीन साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 26 मे रोजी रात्री अडीचच्या सुमारास संशयित कवठेपिरान येथील तरन्नुम मुजावर यांच्या घरी घुसले.
घरातील लोकांना दगडाचा धाक दाखवून 8.71 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोकड असा मुद्देमाल लंपास केला होता. यामध्ये मुजावर किरकोळ जखमी झाल्या होत्या. या घटनेनंतर पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी एलसीबी आणि सांगली ग्रामीण पोलिसांना तातडीने तपास करून संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले होते.
या गुन्ह्याचा तपास सांगलीचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव करत आहेत. त्यानंतर एलसीबी आणि ग्रामीण पोलिसांचे पथक चोरट्यांचा शोध घेत होते. त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार काक्या काळे याला फाळकेवडी येथून दि. 13 जून रोजी ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने अन्य साथीदारांच्या मदतीने हा दरोडा घातल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 4 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.
पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, ग्रामीणचे निरीक्षक शिवाजीराव गायकवाड, मेघराज रुपनर, संतोष माने, रमेश कोळी, सचिन मोरे, संजय कांबळे, सचिन धोतरे, आमसिद्ध खोत, कुबेर खोत आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.