मिरजेत घरफोड्या करणाऱ्या 5 जणांना अटक : 6.53 लाखांचा मुद्देमाल जप्त
मिरज : खरा पंचनामा
मिरज शहर परिसरात विविध ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या 5 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडुन चोरीचे दागिने, रोकड, संगणक, त्याचे साहित्य असा 6 लाख 53 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिरज शहरातील 6 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
महंमद कैस फैयाज मुल्ला (वय 20, रा. गुरुवार पेठ), लुमान अजीज गद्यालपटेल (वय 22, रा. किल्ला भाग), शाहिद मुनीर गोदड (वय 22, रा. टाकळी रोड), फैयाज सिकंदर गोदड (वय 19, रा. टाकळी रोड), अरबाज फैयाज वांगरे (वय 22, रा. किल्ला भाग, मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी चोरीतील गुन्हेगारांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मिरज शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी एक पथक तयार केले होते.
काही दिवसांपूर्वी बोलवाड रोड परिसरातील एका घरात चोर घुसल्याची माहिती नागरिकांनी निरीक्षक झाडे यांना दिली. त्यांनी पथकाला घटनास्थळी पाठवले. त्यावेळी यातील काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी काही साथीदारांची नावे दिली. त्यांनाही ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी मिरज शहरातील 6 ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली.
त्यांच्याकडून चोरीचे दागिने, रोकड, संगणक आणि त्याचे साहित्य, मॉनिटर, मोबाईल असा 6 लाख 53 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मिरजेचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिलडा, निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव, लक्ष्मण कौजलगी, दीपक परीट, श्रीकांत केंगार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.