'त्या' अधिकाऱ्याच्या घरात सापडली सात लाखांची रोकड
सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
फायर आडिट झाल्यानंतर अंतिम ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी सव्वा लाखांची लाच घेणाऱ्या त्या प्रभारी अग्नीशमन अधिकाऱ्याच्या घरात तब्बल सात लाख एक हजार सहाशे रूपयांची रोकड सापडली आहे. ती जप्त करण्यात आली आहे. काही कागदपत्रेही जप्त करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. त्या अधिकाऱ्याच्या घरात इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचा प्रभारी अग्नीशमन अधिकारी विजय पवार याला मंगळवारी सव्वा लाख रूपये लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. पवार याला अटक केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्या सांगलीवाडीतील घरावर मंगळवारी रात्री उशीरा छापा टाकला. त्यावेळी त्याच्या घर झडतीमध्ये तब्बल सात लाख एक हजार सहाशे रूपयांची रोकड सापडली. त्याशिवाय काही आक्षेपार्ह कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहे.
फायर सिस्टीम बसवणाऱ्या कंपनीला अंतिम ना हरकत दाखला देण्यासाठी पवार याने सुरुवातीला दीड लाख रूपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर सव्वा लाख रूपयांवर तडजोड झाल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी सव्वा लाखांची लाच घेताना पवार याला रंगेहात पकडण्यात आले आहे. मंगळवारी रात्री उशीरा त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोकड सापडली. काही कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आले आहेत. दरम्यान बुधवारी सायंकाळी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.